प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतचोरी विरोधातील सुप्रीम कोर्टातील लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवर मतचोरीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप करत आंबेडकरांनी काँग्रेसला या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मात्र, काँग्रेसकडून अद्याप शांतता आहे. याच शांततेमुळे आंबेडकरांनी आता काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दिल्लीच्या राजकीय गोटातही हा मुद्दा गाजतोय. पण काँग्रेसच्या गप्प राहण्याने आंबेडकर चांगलेच संतापले आहेत.
आंबेडकरांनी आपल्या तिखट पत्रात म्हटले आहे की, मी 10 ऑगस्ट 2025 रोजी खरगे आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून मतचोरी विरोधातील लढाईत एकत्र येण्याचे निमंत्रण दिले होते. पण आज, 14 ऑगस्ट 2025 उजाडला तरी काँग्रेसकडून साधा सूरही निघाला नाही. आंबेडकरांनी यापूर्वीही 16 जानेवारी 2025 रोजी खरगेंना पत्र लिहून निवडणुकीतील गैरव्यवहार विरोधात एकजुटीने लढण्याची विनंती केली होती. पण काँग्रेसने त्यावेळीही पाठ फिरवली. आंबेडकरांचा असा आरोप आहे की, जर काँग्रेसने त्यावेळी साथ दिली असती, तर निवडणूक आयोगाचा पर्दाफाश झाला असता. भविष्यातील निवडणुकींमध्ये अशा घोटाळ्यांना आळा बसला असता.
Parinay Fuke : फाळणीच्या स्मृतीतून आमदाराने दिला एकतेचा संदेश
काँग्रेसची चुप्पी संशयास्पद
आंबेडकर म्हणतात, राहुल गांधी आणि काँग्रेसने जर आमच्या कायदेशीर लढ्यात साथ दिली असती, तर महाराष्ट्रातील मतचोरीचा मुद्दा देशभर गाजला असता. पण काँग्रेसची ही चुप्पी कशाला सूचित करते? लोकशाही आणि संविधान धोक्यात असताना काँग्रेस का गप्प आहे? आंबेडकरांनी थेट सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या याचिकेत काँग्रेसला हस्तक्षेप याचिका दाखल करून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आम्हाला कोणताही अहंकार नाही. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्वांना सोबत घेऊन लढू, असे आंबेडकरांचे उद्गार आहेत.वंचित बहुजन आघाडीचे चेतन अहिरे यांनी 2024 निवडणुकीच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याचिकेत सायंकाळी 6 वाजेनंतर झालेल्या 76 लाख मतांवर आक्षेप घेण्यात आला होता. निवडणूक आयोगाने आरटीआय अर्जाला माहिती उपलब्ध नाही असे उत्तर दिल्याने हा मुद्दा आणखीच पेटला. आंबेडकरांनी काँग्रेसला पुन्हा एकदा संधी दिली आहे. पण त्यांच्या या आवाहनाला काँग्रेस कसा प्रतिसाद देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणतात, जर काँग्रेसने आमच्या लढ्याला पाठिंबा दिला नाही, तर याचा अर्थ ते लोकशाहीच्या बाजूने नाहीत का? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आंबेडकरांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले असून, मतचोरीच्या मुद्यावर ते मागे हटण्याच्या मन:स्थितीत नाहीत.
