महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह शहरभर पसरलेला आहे. परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला आहे. प्रत्येक गल्लीबोळात बाप्पा विराजमान झाले आहेत. विघ्नहर्ताच्या आगमनानंतर ढोल-ताशांचा नाद, फुलांचा सुगंध आणि भक्तीचा रंग यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. पण या उत्सवाच्या रंगात केवळ भक्तीच नाही, तर राजकीय रंगदेखील मिसळले आहेत. कारण, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ येत आहे. बाप्पाच्या चरणी प्रत्येक पक्ष साकडं घालत आहे, ‘विघ्न दूर कर, रिद्धी-सिद्धी प्राप्त होऊ दे आणि निवडणुकीत यश मिळू दे, अशी प्रार्थना प्रत्येक पक्ष करतांना दिसत आहे. पण या सगळ्यात सर्वांचे लक्ष लागले आहे ठाकरे बंधूंच्या युतीकडे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची दोन दशकांनंतर झालेली युती बाप्पाच्या आशीर्वादाने टिकेल की निवडणुकीच्या गणितात अडकेल, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर ठाकरे बंधूंची युती ही एखाद्या नाटकाच्या कथानकासारखी आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठी भाषेचा मुद्दा घेऊन राज ठाकरे यांनी राज्यात वादळ उठवले होते. मराठी माणसाला महाराष्ट्रात स्थान हवे, मराठी भाषा आलीच पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. या मुद्द्याला महाविकास आघाडीतील पक्षांनीही पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनीही आपल्या बंधूंच्या या भूमिकेला हात दिला. यातूनच ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू झाली. 5 जुलै 2025 दिवस तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. त्यांच्या युतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण ही युती खरोखरच मराठी माणसाच्या हितासाठी आहे, की फक्त निवडणुकीच्या गणितासाठी, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
Corporation Elections : प्रभागरचनेत पुन्हा दिसले 2017 मधील प्रतिबिंब
भवितव्य गूढ
मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंनी बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत एकत्र येत आपली ताकद आजमावली. ही निवडणूक त्यांच्यासाठी एकप्रकारे लिटमस टेस्ट होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि राज ठाकरे यांच्या मनसेने एकत्र येत ‘उत्कर्ष पॅनेल’ स्थापन केले. बेस्ट पतपेढीवर गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे यांच्या कामगार सेनेची सत्ता होती. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी संधी होती. पण निकालाने सर्वांना धक्का दिला. 21 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. हा पराभव म्हणजे त्यांच्या युतीला लागलेली पहिली खिळ ठरली आहे. या पराभवाने ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आणि पक्षांतर्गत असलेली फूट यामुळे युतीची डळमळीत अवस्था समोर आली आहे.
अनेक कार्यकर्त्यांनी दोन्ही पक्षांना रामराम ठोकत अन्य पक्षांमध्ये आश्रय घेतला आहे. युती जरी झाली असली, तरी कार्यकर्त्यांचे मन जुळलेले नाही, हे स्पष्ट दिसते. आगामी महापालिका निवडणुकीत ही युती टिकेल का? की बाप्पाच्या कृपेने एकत्र आलेले ठाकरे बंधू पुन्हा वेगळे होतील? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात गाजतोय.महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंची युती ही एका सिनेमासारखी आहे. कधी नाट्यमय, कधी भावनिक, तर कधी अनपेक्षित वळण घेणारी. पण या सिनेमाचा शेवट कसा होणार? बाप्पाच्या आशीर्वादाने ही युती निवडणुकीच्या रणधुमाळीत विजय मिळवेल, की पराभवाच्या धक्क्याने पुन्हा दुराव्याची वाट धरेल? याचे उत्तर कदाचित आगामी निवडणुकीतच मिळेल. तोपर्यंत, बाप्पाच्या भक्तीच्या रंगात राजकारणाचे रंग मिसळत राहतील आणि ठाकरे बंधूंची युती चर्चेचा विषय बनून राहील.
