नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात महिलांसाठी सुरू झालेल्या ‘चिमणीघर’ उपक्रमामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याबरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्यास नवा आधार मिळाला आहे.
नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तालयात एक प्रेरणादायी उपक्रमाने आकार घेतला आहे. ज्याने संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठेचा अनोखा मिलाफ साकारला आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन, 4 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता या संकल्पनेला मूर्त रूप प्राप्त झाले. हा उपक्रम नागपूरच्या पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांच्या जीवनात नवचैतन्य घेऊन आला आहे. यामुळे त्यांच्या व्यावसायिक कर्तव्याला आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांना एक नवीन दिशा मिळाली आहे. जिथे त्यांच्या भावनांना आणि समर्पणाला समान आदर देण्यात आला आहे.
डॉ. रवींद्र सिंगल यांनी आपल्या संवेदनशील दृष्टिकोनातून महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या आव्हानांना समजून घेतले. त्यांच्या मनात एक स्वप्न जागृत झाले. एका अशा ठिकाणाचे, जे कर्तव्य आणि कौटुंबिक जीवनाला सुसंनादाने जोडेल. या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी विशेष प्रशिक्षित तज्ञ श्रीमती प्रिन्सी सोनी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी एकजुटीने परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांतून पोलीस मुख्यालयात एका अनोख्या सुविधेचा उदय झाला. ज्याने नागपूरच्या पोलीस दलाला देशभरासाठी एक आदर्श बनवले आहे.
कर्तव्याला आधार
या उपक्रमाला ‘चिमणीघर’ असे हृदयस्पर्शी नाव देण्यात आले आहे. जे लहान मुलांच्या कोमल मनांना प्रेमाने सांभाळण्याच्या भावनेला साकार करते. चिमणीघर हे केवळ पाळणाघर नाही, तर एक सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी आश्रयस्थान आहे. जिथे पोलीस कर्मचाऱ्यांची लहान मुले काळजीपूर्वक वाढतील. येथे मुलांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाते. उद्घाटन सोहळ्यात 34 पोलीस ठाण्यांमधून आणि 10 शाखांमधून 80 महिला कर्मचारी, 4 महिला अधिकारी आणि 60 लहान मुलांसह 144 व्यक्तींच्या उपस्थितीने हा क्षण महत्त्वाचा बनला.
Nagpur : निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेवर आयोगाचा शिक्कामोर्तब
पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले की, चिमणीघर हे महिला कर्मचाऱ्यांसाठी एक हक्काचा दिलासा आहे. यामुळे त्या निश्चिंतपणे कर्तव्य पार पाडू शकतील. कौटुंबिक जीवनात समतोल साधू शकतील. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, हा उपक्रम इतर पोलीस दलांसाठीही प्रेरणास्थान ठरेल. सहपोलीस आयुक्त श्री नवीन चंद्र रेड्डी यांनी चिमणीघराच्या गरजेवर जोर दिला. तर उपायुक्त श्रीमती महक स्वामी यांनी त्याचे महत्त्व विशद केले. पोलिस इन्स्पेक्टर निशा खोब्रागडे, महिला पोलिस कॉन्स्टेबल अवेक्षणी आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रगती यांनी आपल्या अनुभवांतून या उपक्रमाचे मूल्य स्पष्ट केले. डॉ. सिंगल यांच्या नेतृत्वाखालील हे पाऊल नागपूरच्या पोलीस दलाला नव्या उंचीवर घेऊन जाणारे आहे.
