महाराष्ट्र

Akola Airport : निधी मंजूर होण्याचे खरे क्रेडिट कुणाला?

BJP Vs Congress : शिवणी विमानतळासाठी 209 कोटींचा निधी

Post View : 41

Author

अकोल्याच्या शिवणी विमानतळाला 209 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यावरून पुन्हा श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

ध्यानीमनी नसतानाही अमरावतीचे बेलोरा विमानतळ सुरू झाले आहे. बेलोऱ्यातून विमानांचे उड्डाणही सुरू झाले. त्यामुळे अकोल्यात भाजपवर टीका सुरू झाली. अकोल्याचे मॉडेल रेल्वे स्टेशन अनेक वर्षांपासून मंजूर होते. मात्र अमरावतीमध्ये पाठीमागून येत सुसज्ज इमारत उभारली गेली. विमानतळाच्या बाबत देखील हाच प्रकार झाला. सातत्यानं टीका होऊ लागल्यानं अनेकांनी सरकारला साकडं घालणं सुरू केलं. आता सरकारने शिवणी विमानतळासाठी 209 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी हा निधी आपल्यामुळं आल्याचे सांगितलं आहे. भाजपचे खासदार अनुप धोत्रे यांच्यामुळेच हा निधी मंजूर झाल्याचा दावा भाजपनं केला आहे. ‘द लोकहित लाइव्ह’ने याबाबत ‘फॅक्ट चेक’ करीत निधी खरोखर कोणामुळे मिळाला, याची तपासणी केली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय महसूल आयुक्त, मंत्रालय आणि नवी दिल्लीतील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यातून निधी खरोखर कोणामुळे मिळाला, याचा उलगडा झाला.

Akola Airport : ‘वर्षा’तून अकोल्याच्या आकाशात नव्या वाऱ्यांची आशा

यापूर्वीही वाद

आमदार साजिद खान पठाण आणि भाजपमध्ये यापूर्वीही श्रेयवादावरून वाद रंगला होता. अकोल्यातील जुने शहर भागातील डाबकी रोडच्या विस्ताराचे काम सुरू आहे. या ठिकाणच्या पाहणीवरून भाजपने साजिद यांना टार्गेट केले होते. साजिद खान यांच्या समर्थकांनी मात्र त्यांचीच बाजू उचलून धरली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा श्रेयवादाचे प्रकरण अकोल्यात रंगले. अकोल्याचे आराध्य दैवत राजेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यावरून. आपण विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे निधी मंजूर झाल्याचा दावा साजिद यांनी केला होता. त्यानंतर भाजपने याबाबत अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांचे पत्र आणि प्रस्तावात त्यांचे नाव असलेले दस्तऐवज व्हायरल केले होते.

आता पुन्हा एकदा साजिद खान आणि भाजप यांच्यात निधी आणण्याचे श्रेय घेण्यावरून वाद रंगला आहे. भाजप म्हणते की, खासदार अनुप धोत्रे यांच्यामुळे हा निधी मिळाला. आमदार साजिद खान म्हणतात की, त्यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केल्याने निधी मंजूर झाला. ‘द लोकहित लाइव्ह’ने याबाबत सर्व रेकॉर्डवरील कागदपत्र, विधिमंडळातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर वस्तुस्थितीचा निष्कर्श गाठला आहे. आमदार साजिद खान यांनी अकोल्याच्या विमानतळाबाबत विधानसभेत प्रश्न मांडला होता, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यांच्या आमदार होण्यापूर्वी अनेकदा आमदार वसंत खंडेलवाल आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही विधान परिषदेत हा प्रश्न मांडला.

Belora Airport : देवाभाऊंच्या उपस्थितीत अमरावतीच्या आकाशात पूर्ण वेळ टेकऑफ

अशी असते प्रक्रिया!!

कोणत्याही आमदाराने प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधित मंत्री विधिमंडळात त्यावर उत्तर देत असतात. या सर्व प्रश्न, उत्तरांना विधिमंडळाच्या रेकॉर्डवर नोंदविले जाते. आमदाराने प्रश्न उपस्थित केल्यानंतर जे मंत्री उत्तर देतात, ते देखील रेकॉर्डवर घेतले जाते. आता जाणून घेऊया दुसरी बाजू. सर्वसाधारणपणे ज्या पक्षाचे सरकार असते, त्याच पक्षाचे आमदार आक्रमकपणे मंत्र्यांकडे किंवा सरकारकडे निधीची मागणी करीत असतात. सत्ता आणि आमदार आपलाच असल्याने सरकारही निधी मंजूर करते. त्याची नोंद प्रत्येक सरकारी पत्रव्यवहारावर असते.

अकोल्याच्या शिवणी विमानतळाबाबत यापूर्वी विधान परिषद आमदार वसंत खंडेलवाल यांचे नाव रेकॉर्डवर आहे. मात्र ज्या 209 कोटी रुपयांच्या निधीवरून श्रेयवादाचा लढा सुरू आहे. त्याबाबत खासदार अनुप धोत्रे यांचेच नाव अधिकृतपणे रेकॉर्डवर आढळले. आमदार साजिद खान पठाण यांनी विमानतळाबाबत उपस्थित केलेला प्रश्न वेगळा आहे. सरकारने जो निधी मंजूर केला, तो या प्रश्नापेक्षा वेगळा असल्याचे रेकॉर्डवर आढळले आहे.

नागपूरसह तीन Airport वेळेत होणार पूर्ण

खरे श्रेय यांना..

विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या रेकॉर्डवर आणि केंद्रीय नागरी विमान उड्डयन विभागाच्या रेकॉर्डवरही खासदार अनुप धोत्रे यांचेच नाव आढळले आहे. शिवणी विमानतळाला 209 कोटी रुपयांचा निधी मिळाला. या निधीबाबतच्या सर्व बैठकीतही खासदार अनुप धोत्रे यांचेच नाव आहे. त्यामुळे अतिरिक्त जमिन अधिग्रहणासाठी मिळालेल्या या निधीचे श्रेय खासदार अनुप धोत्रे यांना जात असल्याचे ‘फॅक्ट चेक’मध्ये आढळले आहे.

अकोला विमानतळाच्या प्रश्नासाठी विधान परिषदेचे आमदार वसंत खंडेलवाल, दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा हे देखील प्रयत्नशील होते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विमानतळाच्या मुद्द्यावर आमदार अमोल मिटकरी आणि आमदार साजिद खान पठाण यांनी विधिमंडळात सरकारचे लक्ष वेधले. पण सरकारकडून निधी खेचून आणण्याचे या दोन्ही आमदारांना नाही. परंतु या प्रश्नावर त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला, ही देखील वस्तुस्थिती आहे.

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!