नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्यासह राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
Nagpur : उपराजधानी नागपूरचे विद्यमान पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या जागी नवीन आयुक्त कोण येणाार, याच्या उत्सुकतेला मंगळवारी (23 जून 2026) पूर्णविराम मिळाला. राज्यातील अपर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागातून धडकले आणि देवाभाऊंनी आपल्या गृहशहराबद्दल नांगरे पाटील यांच्यावर ‘विश्वास’ दाखविल्याचे दिसून आले.
डॉ. रवींद्र सिंगल यांची बदली करीत त्यांना राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) अपर पोलीस महासंचालक करण्यात आले. डॉ. सिंगल यांच्या जागेवर एसीबीचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली.
Nagpur Traffic : अपघात कमी झाले हो… अब्रु वाचविण्यासाठी DCP झाले PRO
अनेक ठिकाणी काम
विश्वास नांगरे पाटील यांनी राज्याच्या पोलिस दलात अनेक ठिकाणी काम केले आहे. 1997 तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेल्या नांगरे यांना मुंबई, पुणे, नाशिक येथेही कामाचा त्यांना अनुभव आहे. मुंबईत त्यांनी उपायुक्त म्हणून काम केले. ठाणे ग्रामीणचे ते पोलिस अधीक्षकही होते. नाशिकचे पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली.
देवेन भारती यांनी गाजविलेल्या मुंबईच्या सहपोलिस आयुक्त पदावरही नांगरे यांनी काम केले. मुंबईत 2008 मध्ये ताज हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी विश्वास नांगरे पाटील आणि देवेन भारती या दोन्ही अधिकाऱ्यांनी धडाकेबाज कामगिरी केली होती.
नागपुरात 45 दिवसात तब्बल 12 खून झालेत. मुख्यमंत्र्यांच्या गावात सध्या पोलिसांवर व्हीव्हीआयपी बंदोबस्ताचा प्रचंड ताण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासह अनेक अतिमहत्वाच्या व्यक्तींचे दौरे सतत नागपुरात सुरू असतात. त्यामुळे नागपूर पोलिस दलावर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यापेक्षा बंदोबस्ताचा ताण जास्त आहे. त्यातून नांगरे पाटील यांना गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवावे लागणार आहे.
धुमाळ, जगतापही बदलले
अपर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांसोबतच गृह विभागाचे पोलिस अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही बदली केली आहे. त्यानुसार बुलढाण्याचे अपर पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा यांना हिंगोलीत पोलिस अधीक्षक करण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर चंद्रपुरातून एसआरपीएफचे समादेशक पीयूष जगताप आले आहेत.
अमरावती शहरात कार्यरत उपायुक्त रमेश धुमाळ यांना नागपूर शहरात पाठविण्यात आले आहे. गडचिरोलीच्या एसआरपीएफचे समादेशक नारायण शिरगांवकर यांना अहिल्यानगरला पाठविण्यात आले आहे. अमरावतीच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस अधीक्षक प्रांजली सोनावणे यांना अमरावती शहर पोलिस दलात उपायुक्त म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. वाशीमचे अपर पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांना राज्यपालांच्या परिसहायक पदावर पाठविण्यात आले आहे.
