महाराष्ट्र

Akola : विकासाच्या मैदानात साजिद पठाण यांचा ‘रिपोर्ट कार्ड’

Congress : वास्तवाचा आरसा दाखवत भाजपला घेरले

Post View : 63535

Author

अकोल्यातील विकासाच्या राजकारणात आता नवा वाद पेटला आहे. पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेल्या ‘हिशेबा’ने भाजपवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अकोला महापालिकेतील शहर सुधार आघाडीने सत्तेतील दीडशे दिवसांचा विकासाचा अहवाल सादर केल्यानंतर काँग्रेसने त्यावर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेते डॉ. जिशान हुसेन यांनी पत्रकार परिषद घेऊन अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली. तसेच भाजपच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत, शहरातील प्रत्यक्ष परिस्थिती पाहूनच विकासाच्या गप्पा माराव्यात, असे त्यांनी म्हटले. डॉ. हुसेन यांनी सांगितले की, आमदार साजिद पठाण यांनी पहिल्याच विधिमंडळ अधिवेशनात अकोल्यातील राजराजेश्वर मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर मंदिराच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, आता या निधीत कपात करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

एका मुस्लिम आमदाराने मंदिरासाठी पुढाकार घेतल्यामुळे काही भाजप नेत्यांना ते खटकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय मोर्णा नदी विकास आराखडा, गणेश घाटाचे सुशोभीकरण, उर्दू घरासाठी १५ कोटी रुपये, अकोला विमानतळ विस्तारासाठी भूसंपादनासाठी २०० कोटी रुपयांचा निधी, तसेच वैद्यकीय महाविद्यालय आणि लेडी हार्डिंग रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कस्तुरबा गांधी रुग्णालय पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. शहरातील भूमिगत गटार योजनेमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ७३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. नागरिकांची महसुली कामे जलद व्हावीत यासाठी नवीन अप्पर तहसीलदार पद आणि कार्यालयालाही मंजुरी मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

Parinay Fuke : दादांनी घेतली बाधित गावांची जबाबदारी

नागरिकांची गैरसोय

डॉ. हुसेन यांच्या म्हणण्यानुसार, आमदार निधीतून आतापर्यंत सुमारे १० कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली असून, त्यात कोणताही राजकीय भेदभाव करण्यात आलेला नाही. महापौरांच्या प्रभागालाही ८० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच जिल्हा नियोजन समिती, दलित वस्ती सुधारणा आणि नागरोत्थान योजनेतील निधी सर्व नगरसेवकांना समान पद्धतीने देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. हुसेन यांनी शहर सुधार आघाडीवरही जोरदार टीका केली. शहर सुधारण्याचे आश्वासन देणाऱ्यांनी प्रत्यक्षात शहराची दुरवस्था केली असल्याचा आरोप त्यांनी केला. पहिल्याच पावसात रस्ते, नाले आणि इतर नागरी सुविधांचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेत विरोधी पक्षाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असून विरोधी नगरसेवकांवर कारवाई केली जात असल्याचाही त्यांनी आरोप केला. मालमत्ता करात कचरा संकलनाच्या नावाखाली करण्यात आलेल्या सुमारे ६०० रुपयांच्या वाढीला त्यांनी विरोध दर्शवला. शहराच्या हिताविरोधात घेतलेल्या निर्णयांविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणार असून, गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!