
आधीच विलंबानं जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला पुन्हा ग्रहण लागलं आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतल्यानं दोन जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.
राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांचे पालकमंत्री घोषित झाले आहेत. शासकीय यंत्रणेकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त तयारी सुरू आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून ध्वजवंदन कोण करणार? यावरून दोन जिल्ह्यांसाठी घोळ सुरू होता. अशात राज्य सरकारनं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांची निवड स्थगित केली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पुन्हा निश्चित झालेले नाहीत. राज्य सरकारने पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचे आदेश काढल्यानंतर महायुतीत अंतर्गत धुसफुस सुरू झाल्याचं दिसलं.
रायगडचे पालकमंत्री म्हणून महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. भाजपाचे संकटमोचक समजले जाणारे पाणीपुरवठा मंत्री गिरीश महाजन यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली होती. परंतु या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री नियुक्तीला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेकडून आग्रह करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. पालकमंत्री पद न मिळाल्यास केवळ नाराजीच नाही तर महायुतीतील संबंध बिघडू शकतात, असे संकेत शिवसेनकडून देण्यात आल्याची माहिती आहे.

थेट राजीनामाच सोपवला
रायगडचे पालकमंत्री होण्यासाठी मंत्री भरत गोगावले उत्सुक आहेत. नाशिकचे पालकमंत्री होण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आग्रही आहेत. अदिती तटकरे यांना पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्ग शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. रायगडचे पालकमंत्री पद भरत गोगावले यांना मिळावे, या मागणीसाठी शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट राजीनामेच सोपवले.
गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्री पद मिळायला हवे होते, अशी भूमिका शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मांडली होती. परंतु त्यांना पालकमंत्री पद का मिळाले नाही? याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून कारण जाणून घेणार, असे गुलाबराव पाटील म्हणाले. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आपल्याला जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांनी पाठिंबा दिला होता, असे भरत गोगावले म्हणाले होते.
वडिलांना साथ देणाऱ्यांच्या प्रेमाची परतफेड करण्याची Akash Fundkar यांना संधी
टोकाच्या विरोधामुळे स्थगिती
महायुतीत नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे. शिवसेनेतील मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री बदलण्याची मागणी केली. शिवसेनेकडून हा प्रखर विरोध पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दावोस येथील परिषदेसाठी मुख्यमंत्री विदेशात गेलेले आहेत. तेथून मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासनाला नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची नियुक्ती स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामूळे सामान्य प्रशासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी रायगडसह नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.