प्रशासन

Bhandara ZP : कारचा शौकिन जेई अडकला एसीबीच्या सापळ्यात

ACB Action : आरओ प्लान्टसाठी लाच घेताना पकडले

Post View : 39

Author

दरवर्षी नवीन कार घेण्याचे शौकिन असलेले कनिष्ठ अभियंता लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत. सुहास करेंजकर हे पकडण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंत्याचं नाव आहे.

भंडारा जिल्हा परिषद प्रशासनाला शुक्रवार, 28 फेब्रुवारीला मोठा हादरा बसला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत एका अधिकाऱ्याला पकडले. सुहार करेंजकर हे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. करेंजकर हे भंडारा जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता आहे. पाणी पुरवठा विभागात त्यांची नेमणूक आहे. आरओ प्लान्टच्या कामाचे बिल काढण्यासाठी करेंजकर यांनी आठ टक्के कमिशन मागितल्याचा आरोप आहे. 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राजकीय वर्तुळात बऱ्यापैकी वजन असलेल्या आणि नुकतेच दमदार कमबॅक करणाऱ्या एका नेत्याच्या साळ्यानं सुहास करेंजकर यांची तक्रार केल्याचं सांगण्यात येत आहे. भंडारा जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागाकडून आरओ प्लान्ट बसविण्यात आले होते. त्या कामाचे 9 लाख 80 हजार रुपयांचे बिल थकले होते. काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारानं हे बिल प्रशासनाकडं सादर केलं. त्यानंतर करेंजकर यांनी कंत्राटदाराला बिलाच्या एकूण रक्कमेपैकी आठ टक्के रक्कम मागितल्याचा आरोप आहे. सुरुवातीला करेंजकर यांनी मागितलेली रक्कम मोठी होती. परंतु तडजोडीनंतर 40 हजार रुपयांत सौदा ठरला.

Nana Patole : नवा पत्ता, मुक्काम पोस्ट सुकळी, जिल्हा भंडारा

बंगला न्यारा, आलीशान कार

कनिष्ठ अभियंता असलेल्या सुहास करेंजकर यांना पकडल्यानंतर आता त्यांच्या संपत्तीची चौकशी केली जाणार आहे. करेंजकर यांच्याकडे चार ते पाच बंगले असल्याची चर्चा आता भंडारा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे करेंजकर दरवर्षी नवीन कारही खरेदी करतात. कारचे कोणतेही मॉडेल त्यांनी एक वर्षापेक्षा जास्त काळ वापरलेले नाही, असं जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एसीबीच्या पथकाला सांगितलं. त्यामुळं करेंजकर त्यांच्या तथाकथित सर्व बंगल्यांची झाडाझडती आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

करेंजकर यांना महागड्या कारचाही शौक आहे. त्यामुळं त्यांनी सुरुवातीपासून आजपर्यंत खरेदी केलेल्या सर्व वाहनांचा तपशिलही आता बाहेर काढला जाणार आहे. बिल काढण्यासाठी करेंजकर यांनी मागितलेली रक्कम ते स्वत:च खिशात टाकणार होते की त्यात अन्य कोणाचा वाटा होता, याचाही तपास केला जाणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेतील या गैरप्रकाराची तक्रार एका नेत्याच्या साळ्यानं केल्यानं राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. असं नेमकं काय झालं की नेते साहेबांचे साळेसाहेब नाराज झालेत, याबद्दल आता भंडाऱ्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!