बुलढाण्यातील मलकापूर तालुक्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Women’s Safety : दुधलगावातील निर्जन शेतात मध्यरात्री घडली संतापजनक घटना. लूटमार अयशस्वी ठरल्यानंतर महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मलकापूर ग्रामीण पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दुधलगाव परिसरात निर्जन शेतात राहणाऱ्या सालदार दाम्पत्यावर झालेल्या भीषण घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर काही अज्ञात दरोडेखोरांनी शेतातील घरात घुसून लूटमार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दाम्पत्याकडे मोबाईल वगळता दागदागिने अथवा रोख रक्कम नसल्याचे समजताच आरोपींचा संताप अनावर झाला.
रक्कम नसल्याचा वचपा
आरोपींनी विळ्याचा धाक दाखवत सालदाराच्या पत्नीवर आळीपाळीने सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. पीडित दाम्पत्याने नंतर पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर शनिवारी दुपारी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे संकलित करण्यात आले आहेत. परिसरातील विविध मार्गांवरील हालचालींची माहिती तपासली जात आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पीडितेची तपासणी
पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा जबाबही नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे निर्जन भागातील शेतांमध्ये वास्तव्यास असलेल्या शेतमजूर आणि सालदार कुटुंबांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
विविध सामाजिक संघटनांनीही या घटनेचा निषेध नोंदवत महिलांच्या सुरक्षेसाठी ग्रामीण भागात रात्रीची गस्त वाढविणे, निर्जन शेतांमध्ये सुरक्षा उपाययोजना करणे आणि पीडितेला तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तपास वेगाने सुरू ठेवला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी सर्व उपलब्ध तांत्रिक आणि वैज्ञानिक साधनांचा वापर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिकृत तपास अहवालानंतरच संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
