भंडारा तालुक्यातील तिड्डी–मानेगाव मार्गाची दुरवस्था पाहता ग्रामस्थांनी तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
Rural Development : तालुक्यातील मौजा तिड्डी–मानेगाव हा महत्त्वाचा संपर्क मार्ग गेल्या २० ते २२ वर्षांपासून दुरुस्तीअभावी अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना रोज मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, भंडारा तसेच पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन सादर करून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
तिड्डी–मानेगाव बाजार हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे २० वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आला होता. त्यानंतर या मार्गाचे कोणतेही मोठे नूतनीकरण किंवा दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. परिणामी संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचत असल्याने रस्ता चिखलमय बनला आहे. त्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुरूमाची मलमपट्टी
यापूर्वी ग्रामपंचायतीमार्फत तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला होता. मात्र मुसळधार पावसामुळे तो वाहून गेल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, कामगार, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून ते कुंभकर्ण झोपेत असल्याची तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
अपघाताचा धोका
संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत तसेच कायमस्वरूपी डांबरीकरण किंवा सिमेंटीकरणासाठी आवश्यक निधी मंजूर करून काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला असून त्वरित निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
