
पूर्व विदर्भातील महत्वाच्या असलेल्या दोन जिल्ह्यांमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सध्या भाजपचे एक आमदार सरकार आणि लोकांमधील संवादसेतू बनला आहे.
गावातील रस्त्याची समस्या असो किंवा ग्रामपंचायतीला मिळणारा निधी. भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील लेाक सध्या महायुती सरकारमधील संवादसेतू ठरत असलेल्या एका आमदाराकडेच धाव घेत आहेत. नागरिकांचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचविणारा हा आमदार दुसरा कोणी नसून माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये डॉ. फुके भंडारा-गोंदियाचे पालकमंत्री होते. मंत्री असताना त्यांनी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ताकदीनं काम केलं. महायुतीची पाळंमुळं दोन्ही जिल्ह्यात घट्ट केली. डॉ. फुके यांचं काम पाहूनच त्यांना भाजपनं पुन्हा एकदा विधान परिषदेत आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली.
विधान परिषद सदस्य झाल्यानंतर तर डॉ. फुके यांनी भंडारा-गोंदिया दोन्ही जिल्ह्यांमध्ये शंभर हत्तींच्या ताकदीप्रमाणं काम करण्यास सुरुवात केली आहे. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न, कापूस उत्पादकांना मोबदला, धान उत्पादकांचा बोनस, निकृष्ट तांदळाचा पुरवठा, शेतकऱ्यांना पूर्णवेळ मोफत वीज असे अनेक मुद्दे यंदाच्या अधिवेशनात डॉ. फुके यांनी लावून धरले. त्यामुळं विधिमंडळातील त्यांची ताकद पुन्हा एकदा सामान्य जनतेला अनुभवता आली. त्याचा परिणाम आता दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांवर झाला आहे.

Prainay Fuke : आक्रमक भूमिका.. एलएक्यु धमकीचा पर्दाफाश अन् शायरीही
प्रचंड मोठी रांग
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून आपलं गाऱ्हाणं घेऊन डॉ. परिणय फुके यांच्याकडं येणाऱ्यांची संख्या आता दुपटीपेक्षा जास्त झाली आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तीनही जिल्ह्यातून डॉ. फुके यांना भेटायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेष म्हणजे यात ग्रामीण भागातील माताभगिनींची संख्या सर्वाधिक आहे. येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारींची डॉ. फुके हे गंभीरतेने नोंद घेत आहेत. यातील अनेक प्रश्नांसाठी ते स्वत: मंत्रालयातील (Maharashtra Mantralay) अधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिसतात.
भाजपचे अनेक नेते आपल्या मतदारसंघातील नागरिकांना न्याय देण्यासाठी दिवसरात्र एक करतात. यातील अनेक नेत्यांना तर ‘वचनपूर्ती’साठी ओळखलं जातं. भाजपनं दिलेली हिच शिकवण आता आमदार डॉ. परिणय फुके गिरवताना दिसत असल्याचं बोललं जात आहे. दिलेला शब्द पूर्ण करणाऱ्या नेत्यांप्रमाणंच आता डॉ. फुके यांच्याकडंही प्रभावीपणे काम करणारा आमदार म्हणून पाहिलं जात आहे. मतदारसंघातील विकास कामांसोबतच डॉ. फुके आता नागरिकांच्या समस्या सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं दिसत आहे. त्यामुळं भंडारा-गोंदियात ‘पचास.. पचास.. कोस दूर जब कोई समस्या होती है तब लोक परिणय फुके के पास जाते है’, असं बोललं जाऊ लागलं आहे.