
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. ते हेडगेवार स्मृती मंदिरात दर्शन घेऊन दीक्षाभूमीला भेट देणार आहेत.
हिंदू नववर्षाच्या स्वागताचा सोहळा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) ऐतिहासिक भूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होणार आहे. या दोन्ही घटनांचा संगम संघाच्या शतकपूर्ती वर्षातील 30 मार्च रोजी नागपूरमध्ये घडणार आहे. मोदींनी याआधीही नागपूरला अनेकदा भेटी दिल्या, परंतु पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, तब्बल दहा वर्षांनंतर ते संघभूमीवर रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिराला भेट देणार आहेत. या दौऱ्यासाठी नागपुरात मोठ्या जोमाने तयारी सुरु आहे.
मोदींच्या नागपूर दौरा पार्श्वभूमीवर शुक्रवारपासूनच उपराजधानीत संपूर्ण कार्यक्रम स्थळी तसेच संलग्न मार्गांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मोदी यांच्या नागपूर भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते, कारण पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी संघभूमीवर जाणे टाळले होते. यावेळी मात्र त्यांनी संघभूमीत पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दीक्षाभूमीला भेट
मोदी नागपूरमध्ये खास एका नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत. त्यांचा पहिला कार्यक्रम सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ओळखीच्या स्थळी, म्हणजेच रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिरात होणार आहे. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या समाधीचे ते दर्शन घेणार आहेत. या प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचीही उपस्थिती असणार आहे. यानंतर मोदी दीक्षाभूमीला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील.
सकाळी सुमारे दहा वाजता मोदींच्या हस्ते नागपूरच्या माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरची पायाभरणी केली जाईल. गुरुजी माधवराव गोळवलकर यांच्या स्मृतीस अर्पण असलेल्या या नेत्रालयाचा उद्देश सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या, जागतिक दर्जाच्या नेत्ररोग सेवा पुरविण्याचा आहे. या प्रकल्पात 250 खाटांचे रुग्णालय, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि विविध सुविधा समाविष्ट असतील. त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधितही करणार आहेत.
हवाई पट्टीचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यानंतर दुपारी साडेबारा वाजता नागपूरमधील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड येथे जाऊन संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करतील. या प्रकल्पांतर्गत 1 हजार 250 मीटर लांब आणि 25 मीटर रुंद हवाई पट्टी तसेच लोइटरिंग युद्धसामग्रीच्या चाचणी केंद्राचे उद्घाटन होणार आहे. यानंतर मोदी छत्तीसगढ बिलासपूर येथे जाणार आहेत. तिथे सुमारे 33 हजार 700 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. त्यांनी तेथे एका जाहीर सभेतही भाषण देण्याची शक्यता आहे.