महाराष्ट्रातील राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या भोवऱ्यात सापडलं आहे. राज्यातील आर्थिक परिस्थितीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. यानंतर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘एक्स’ या समाज माध्यमावर दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही जुबानी जंग सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका पोस्टद्वारे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी लिहिलं, सरकार सांगते की राज्य आर्थिक संकटात आहे. म्हणूनच वयोवृद्धांसाठी असलेली तीर्थयात्रा योजना बंद करण्यात आली. लाडक्या बहिणींना दोन हजार 100 रुपये दिले जात नाहीत. शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही. मात्र चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी 150 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच आगमन झालं, तेव्हा केवळ हेलिपॅडसाठीच 1.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले. सत्ता भोगणारे लोक पाचतारांकित सुविधा घेत आहेत. सामान्य जनता आर्थिक अडचणीत सापडली आहे, असे सपकाळ म्हणाले.
सपकाळ यांच्या या आरोपांनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं. बावनकुळे म्हणाले, सपकाळ अजून खूप लहान आहेत. त्यांना मोठं होण्यासाठी अजून लांबचा प्रवास करायचा आहे. मात्र तेवढंच नाही, तर त्यांना आपलं बालिश वर्तन देखील सोडावं लागेल. बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की, चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी जे 150 कोटी रुपये खर्च झाल्याचं म्हटलं जात आहे, त्यामागे एक मोठा भ्रम आहे. प्रत्यक्षात हा खर्च फक्त 1.5 कोटी रुपये होता, आणि तोही केवळ जाहिरात प्रकाशनासाठी.
तांत्रिक चूक
बावनकुळे म्हणाले की, लोक निर्माण विभाग, अहिल्यानगर यांनी या बैठकीसाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात दोन वृत्तपत्रांमध्ये छापली गेली होती. एका वृत्तपत्राने ती बरोबर छापली, पण दुसऱ्या वृत्तपत्रात आकड्यांमध्ये दशांश चिन्ह (डॉट) चुकीच्या ठिकाणी लागल्यामुळे ती रक्कम 150 कोटींच्या स्वरूपात वाटली. बावनकुळे पुढे म्हणाले, ही केवळ छपाईतील तांत्रिक चूक आहे. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या खर्चाच्या ऑर्डरमध्ये कुठलाही गैरसमज नाही. तरीही सपकाळ यांनी हे मुद्दाम खोटं पसरवण्याचा प्रयत्न केला.
सपकाळ यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, जेव्हा कोणी असा अनुभवहीन नेता स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी बालिश पद्धतीने माध्यमांमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांच्यावर दया येते. मी त्यांच्या प्रति दुःख व्यक्त करणं हेच योग्य समजतो. या आरोप-प्रत्युत्तरांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद उभा राहिलाय. एका साध्या जाहिरातीतून निर्माण झालेला भ्रम, त्यावरून आरोप करणं, आणि मग ते स्पष्ट करताना राजकीय परिपक्वतेवरच प्रश्नचिन्ह उभं करणं. यामुळे हा वाद केवळ आर्थिक खर्चापुरता मर्यादित न राहता, राजकीय प्रगल्भतेच्या मापदंडापर्यंत पोहोचला आहे.
Gadchiroli : धान खरेदीच्या नावाखाली धांदल करणारे उपप्रादेशिक व्यवस्थापक निलंबित
सपकाळ हे सध्या युवा नेतृत्व मानले जात असले तरी त्यांच्या वकृत्वशैलीत आणि तथ्य पडताळण्यात अजून परिपक्वता यायला वेळ लागेल, असा सूचक इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. आता सर्वांचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहे की, हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून यावर आणखी कोणतं स्पष्टीकरण येतं का? की हा वाद इथेच थांबेल? एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, राज्यातील राजकीय वातावरण काही दिवस तरी या विषयामुळे तापलेलं राहणार आहे.
