जातनिहाय जनगणनेचा निर्णय झाल्यानंतर ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
देशाच्या सामाजिक न्यायाच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकत केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाला मंजुरी दिली. हा निर्णय केवळ प्रशासनिक नाही. सामाजिक परिवर्तनाची दारं उघडणारा निर्णय आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाजानं सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ओबीसींच्या हक्कासाठी या मुद्द्यावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला तो भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी.
समाजासाठी केलेल्या या अविरत संघर्षाची दखल घेत राष्ट्रीय ओबीसी महासंघानं आमदार डॉ. परिणय फुके यांचा सत्कार केला. यातून ओबीसी समाजासाठी डॉ. फुके यांनी किती परिश्रम घेतले हे ठळकपणे दिसून येतं. नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना ओबीसी समाजानं आंदोलन सुरू केलं होतं. त्यावेळी आमदार डॉ. परिणय फुके यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळंच महायुती सरकारनं ओबीसींच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. वसतिगृहांचं काम मार्गी लागलं. शिष्यवृत्तीचा तिढा सुटला. आता केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. यासाठी ओबीसी समाजातील घटक आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमदार डॉ. फुके यांनीही व्यापक पाठपुरावा केला होता.
Vijay Wadettiwar : उंची साडेचार फुटांची, गोष्ट करतात धर्म विचारून सामान घेण्याची
कामाची दखल
आमदार डॉ. परिणय फुके यांनी आतापर्यंत समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून सत्कार करण्यात आला. समाजासाठी न थकता त्यांनी लढा दिल्याचे विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. सत्कार सोहळ्यात केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं कौतुक करण्यात आलं. सरकारच्या या निर्णयाबद्दल जल्लोष व्यक्त करण्यात आला. आमदार डॉ. परिणय फुके यांनी या क्षणाला सामाजिक उत्कर्षाचं पर्व संबोधलं.
भाजपची शीस्त आणि सांसदीय आयुधांचा वापर करीत आमदार डॉ. परिणय फुके यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध पातळीवर ओबीसी समाजाच्या हितासाठी व्यापक पुढाकार घेतला. जातनिहाय जनगणना व्हावी, यासाठी पाठपुरावाही त्यांनी केला. आता अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. केंद्र सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळं ओबीसी समाजाचं हित जपलं जाणार आहे. त्यामुळं समाजात नवचैतन्याचं वातावरण आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीनं नागपूर येथील हिलटॉप परिसरात आमदार डॉ. परिणय फुके यांचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बबनराव तायवाडे यांनी डॉ. फुके यांना सन्मानित केलं. सत्कार समारंभात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. फुके यांच्यावर ओबीसी मंत्रालय स्थापनेसाठी 2017 मध्ये व्यापक भूमिका घेतली होती. आयोगाला घटनात्मक दर्जा मिळवून देण्यासाठीही त्यांनी मोलाचे प्रयत्न केले होते. त्याचा डॉ. तायवाडे यांनी आवर्जून उल्लेख केला. डॉ. तायवाडे आणि डॉ. फुके यांच्या संयुक्त प्रयत्नांतून 2016 ते 2025 दरम्यान ओबीसी संदर्भात सरकारकडून महत्त्वाचे आदेश लागू करण्यात आलेत.
आकड्यांची मोजणी नव्हे
जातनिहाय जनगणना केवळ आकड्यांची मोजणी नाही. ही प्रक्रिया सामाजिक समतेची खरी अंमलबजावणी आहे. वंचित घटकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीची ही किल्ली आहे, असे डॉ. फुके यावेळी म्हणाले. केंद्र सरकारचा निर्णय ओबीसी समाजाच्या संघर्षाला न्याय देणारा आहे. या लढ्याचा एक भाग होणं आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचंही ते म्हणाले. ओबीसी समाजासाठी लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे त्यांनी यावेळी मनापासून आभार मानले. सातत्य, जिद्द आणि एकजुटीच्या जोरावरच स्वप्न साकार झाल्याचं डॉ. फुके यांनी नमूद केलं.
प्रत्येक शहरात ओबीसी भवन उभारण्याचा प्रस्ताव आपण मांडणार आहोत. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात यासंदर्भातील प्रस्ताव आपण सरकारला देऊ, असेही डॉ. परिणय फुके यांनी नमूद केलं. या प्रस्तावासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून निधी मंजूर करून घेणार आहोत. ही योजना ओबीसी समाजाच्या सक्षमीकरणाचा पुढील टप्पा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Maharashtra : शेत रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बनतील गार्डियन्स
