
वारंवार सूचना दिल्यानंतरही मुजोरी कायम ठेवणाऱ्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडची (भेल) आता गिल्ली मिसळ केल्याशिवाय थांबायचे नाही, असा निर्धार भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केलेला दिसत आहे.
भंडारा जिल्ह्यातील साकोलीत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला भूखंड देण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून ही कंपनी स्थानिकांना आश्वासनांची भेळच खाऊ घालत आहे. सोलर पावर उद्योग सुरू करण्यासाठी कंपनीला एमआयडीसीकडून भूखंड वाटप करण्यात आले होते. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ‘भेल’ कंपनीकडून दहा वर्षात कोणताही उद्योग सुरू करण्यात आला नाही. त्यामुळं ‘भेल’नं घेतलेल्या जागेवर आणि तरुणांना रोजगार मिळेल या आशेवर गाजरगवत उगवलं.
जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कंपनीकडून झाली नाही. त्यामुळे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी कंपनीच्या विरोधात एल्गार पुकारला. लोकांना उल्लू बनविण्यााऱ्याया कंपनीला चांगली तिखटाची फोडणी देऊ, त्यांना झणझणीत गिल्ली मिसळ खाऊ घालण्यासाठी डॉ. फुके आक्रमक झालेत. त्यांनी सरकारकडं पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं (MIDC) आता भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांना इशारा दिला आहे.

काही तर हालचाल करा
भंडारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांचा भेलसंदर्भातील रोष वाढत आहे. अशात 9 जून रोजी काही शेतकऱ्यांनी भेलच्या ताब्यात असलेल्या जागेवर प्रवेश केला आहे. त्यामुळं एमआयडीसीनं आता भेलला इशारा दिला आहे. गेल्या दहा वर्षांपासून भेलनं साकोलीत सोलर पावर प्रकल्प सुरू केलेला नाही. साकोलीत प्रकल्प सुरू करायला नसेल तर अन्य ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी एमआयडीसीनं दाखविली आहे. एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत बैठक घेतली होती.
बैठकीत आमदार डॉ. परिणय फुके, भेलचे महाव्यवस्थापक रविंदर सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतरही भेलने एमआयडीसीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. साकोलीत सोलर पावर प्रकल्प सुरू करणार की अन्य ठिकाणी जमिन पाहिजे, याबाबत भेलकडून कोणतीही हालचाल झाली नाही. भेलकडून सुरू असलेल्या या मुजोारीमुळं कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी आता जमिनीवर ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकल्प रखडल्यानं शेतकरी, बेरोजगार तरूण यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका आमदार डॉ. फुके यांनी घेतली आहे. त्यामुळं आता भेलला यासंदर्भात ठोस भूमिका घ्यावीच लागेल असे आता ठामपणं सांगितलं जात आहे.
Parinay Fuke : समृद्धीच्या विकासगंगेचे पावन जल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात
भेलला 19 लाख 28 हजार 995 चौरस मीटर जागेचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी 2013 मध्ये 188.1035 हेक्टर आर जमिन भेलने ताब्यात घेतली. या ठिकाणी सोलर पावर प्रकल्प सुरू होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे भूखंडाचे वाटपपत्र रद्द करण्यात आले. सध्या हा तिढा कायम आहे. प्रकल्पासाठी 100 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळं सोलर प्रकल्प सुरू करण्यात यावा, अशी मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी भेलकडे केली. मात्र अद्यापही त्यावर भेलने पावले उचललेली दिसत नाहीत.
आमदारांनी फिरविले ट्रॅक्टर
गत 12 वर्षांपासून रखडलेल्या भेल प्रकल्पाने शेतकऱ्यांच्या आयुष्याला अनिश्चिततेच्या गर्तेत टाकले आहे. प्रकल्प सुरू होईल, रोजगार मिळेल, विकासाच्या नव्या शक्यता उलगडतील या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सोडून दिल्या. मात्र, वर्षानुवर्षे काहीच न घडल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी मोठं पाऊल उचललं आहे. 9 जून रोजी सकाळी मुंडीपार प्रकल्प स्थळी भाजपचे विधान परिषदेतील सदस्य माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी एकवटले. फुके यांनी थेट अधिग्रहित जमिनीवर ट्रॅक्टर फिरवले, नांगरणी केली आणि पेरणीच्या तयारीला सुरुवात केली. या भूमिगत चळवळीने प्रशासनाची झोप उडवली.
बंद असलेले प्रकल्पाचे गेट उघडण्यात आले आणि शेतकऱ्यांनी आमची जमीन, आमचा हक्क हा नारा प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. परिणय फुके यांनी स्पष्ट सांगितले, प्रकल्प सुरू झाल्यावर जमीन परत देऊ, पण तोवर आम्ही आमच्या नावावर असलेल्या सातबाऱ्यावरील जमिनीवर शेती करणारच. हा संघर्ष कुठल्याही सरकारविरोधात नाही, तर एका अशा कंपनीविरोधात आहे जी शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. या आंदोलनात अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते. डॉ. फुके यांचे हे आंदोलन म्हणजे सत्ताधाऱ्यांनीच दिलेला जनतेच्या बाजूचा इशारा मानला जात आहे. रखडलेल्या विकासाविरोधात आता डॉ. फुके यांच्यासह शेतकरी स्वतःच पुढे सरसावले आहे.