महाराष्ट्र

Parinay Fuke : दूध संघावर भगवा फडकवण्यासाठी भाजप आमदार मैदानात

Bhandara : वैनगंगेच्या तीरावर सहकार क्षेत्रात रणधुमाळी

Share:

Author

भंडाऱ्यातील जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि महायुतीत (भाजप-राष्ट्रवादी) जोरदार संघर्ष रंगतोय. यात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे महायुती सत्तेच्या समीकरणात बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहे.

वैनगंगेच्या तीरावर पुन्हा एकदा राजकीय डावपेचाचा रंगतदार खेळ रंगताना दिसतोय. मात्र, यावेळी रणधुमाळी विधानसभेची नाही, लोकसभेची नाही व महापालिकेचीही नाही. तर रणधुमाळी आहे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सत्तेसाठी. या संघावर दीर्घकाळ आपली पकड असलेल्या काँग्रेसला सत्तेतून हटवण्यासाठी महायुतीच्या मातब्बर नेत्यांनी थेट मैदानात उडी घेतली आहे. या लढतीचं वैशिष्ट्य म्हणजे येथे थेट दोन गट आमनेसामने उभे ठाकले आहेत. एका बाजूला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि साकोलीचे आमदार नाना पटोले यांच्यासह भंडारा ग्रामीणचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जोडी आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे ताकदवान विधान परिषदेचे सदस्य, माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे हे सहकार क्षेत्रात आपली ताकद आजमावत आहेत.

जिल्ह्यात सहकाराच्या राजकारणाला नेहमीच वेगळे स्थान मिळाले आहे. सत्ता कोणाचीही असो, पण सहकारात पक्षीय भिंती नेहमीच झापडले जातात. मात्र यंदा दूध संघाच्या निवडणुकीत हा अपवाद ठरतोय. यावेळी थेट पक्षीय रंग दाखवत महायुती आणि काँग्रेसमध्ये थेट लढत सुरू आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत एकीकडे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याशी हातमिळवणी करत युतीच्या गणितालाच सुरुंग लावला आहे. दुसरीकडे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके आणि सुनील फुंडे यांनी भाजप-राष्ट्रवादीच्या सहकार विकास पॅनलला एकत्र आणत सत्ता परिवर्तनाची रणनीती आखली आहे.

महायुतीची आक्रमक मोहीम

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे नेहमीच आपल्या सकारात्मक विचारसरणी आणि स्पष्ट भूमिकेसाठी ओळखले जातात. भंडारा जिल्ह्यात भाजपची सत्ता टिकवून ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. विकासकामाच्या बाबतीत कायम आघाडीवर असणारे डॉ. फुके यंदाच्या दूध संघाच्या निवडणुकीतही त्यांच्या दूरदृष्टीच्या विचारसरणी आणि रणनीतीच्या जोरावर भाजपला विजय मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीलाही त्यांनी थेट मैदानात उतरून संघटन पॅनलच्या सर्व उमेदवारांची भेट घेतली. ही निवडणूक केवळ सहकारासाठी नाही, तर भंडारा जिल्ह्यात विकासाची नवी दिशा देण्यासाठी आहे, असं स्पष्ट विधान करत त्यांनी विजयाचा आत्मविश्वास दाखवला आहे. त्यांच्या सकारात्मक नेतृत्वामुळे भाजप-राष्ट्रवादीच्या गोटात चैतन्य संचारले आहे.

Narendra Bhondekar : शांत आहे पण रौद्र रूप दाखवलं तर… 

28 जून रोजी भंडाऱ्यात राजकीय घडामोडींना अक्षरशः ऊत आला. एका बाजूला शिवसेनेचा आभार प्रदर्शन सोहळा पार पडला. तर दुसऱ्या बाजूला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक. या दूध संघाची रणधुमाळी एकाच दिवशी तापली. 12 संचालक पदांसाठी तब्बल 25 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचा ‘शेतकरी विकास पॅनल’ विरुद्ध महायुतीचा ‘सहकार विकास पॅनल’ अशी थेट टक्कर रंगली आहे. भोंडेकर-पटोले गटाची ही अनपेक्षित जोडी आणि त्याविरुद्ध डॉ. फुके-फुंडे यांच्या नेतृत्वातील महायुतीची आक्रमक मोहीम त्यामुळे या निवडणुकीचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

भंडाऱ्याच्या सहकाराच्या पंढरीत नेहमीच सत्तांतराचा खेळ रंगत आला आहे. मात्र यावेळी या निवडणुकीत थेट पक्षीय नेते रिंगणात उतरल्यामुळे सामना चुरशीचा ठरतोय. भाजप नेते डॉ. परिणय फुके यांच्या कुशल संघटन क्षमतेवर आणि काँग्रेसच्या जुनाट पकडीवर हा निकाल ठरणार आहे. एकंदरीत, वैनगंगेच्या तीरावर दूध संघाच्या सत्तेसाठी सुरू असलेला हा शह-काटशह आता अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणं राज्यभरातील राजकीय वर्तुळ डोळे लावून पाहत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!