गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि शिवसेना यांनी महापालिका निवडणुकीसाठी शक्ती प्रदर्शन आणि विविध उपक्रमांची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळीही तितकीच रंगत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणूक 2025 मध्ये होणार असल्याने राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विशेषतः महायुती सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गणेशोत्सवाच्या निमित्ताने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारत विरोधकांना धक्का दिला होता. आता, महापालिकेच्या रणांगणात कोणाचा झेंडा फडकणार आणि कोणाचा खाली येणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आत्मा असलेला सण. यंदा तो राजकीय शक्तीप्रदर्शनाचा रंगमंच बनला आहे. शिंदेसेना गणेशोत्सवाच्या निमित्ताने जनतेच्या मनात घर करत आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना लागणारा अवाजवी दंड रद्द करून आणि कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफी जाहीर करून शिंदे सरकारने जनतेच्या मनात गणपती बाप्पासोबतच आपलंही स्थान पक्कं केले आहे. इतकेच नव्हे, तर 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत एसटी महामंडळाच्या 5 हजार 200 विशेष गाड्यांची व्यवस्था करून प्रवाशांना दिलासा दिला आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन तब्बल 11 कोटींचा निधी मंजूर करून शिंदेसेनेने विरोधकांना चकित केले आहे.
RSS : पारंपरिक शेती आणि देशी गोवंशातून आत्मनिर्भरतेचा नवा आराखडा
विरोधकांची तयारी कमी
सगळा थाटमाट म्हणजे निवडणुकीच्या रणनितीचा एक भाग आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.गणेशोत्सवाच्या गजरात शिंदे सेनेने आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे. राज्यातील भजनी मंडळांना 25 हजार रुपयांचे अनुदान जाहीर करून शिंदे यांनी सांस्कृतिक आणि राजकीय मैदानात एकाचवेळी बाजी मारली आहे. 23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्जाद्वारे हे अनुदान मिळवता येणार आहे. ही घोषणा म्हणजे केवळ सांस्कृतिक पाठबळ नव्हे, तर मतदारांना आकर्षित करण्याचा एक चतुर डाव आहे. विरोधकांना हा निर्णय पाहून चांगलाच धक्का बसला आहे. कारण गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिंदे सेना जनतेच्या जवळ जाण्यात यशस्वी होताना दिसत आहे.
महापालिका निवडणुकीच्या आधी गणेशोत्सव हा राजकीय पक्षांसाठी शक्तीप्रदर्शनाचा सर्वात मोठा मंच आहे. शिंदेसेना या संधीचे सोने करताना दिसत आहे. तर विरोधक मात्र अजूनही रणनिती आखण्यात मागे पडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नसताना, शिंदे यांनी आता महापालिकेच्या रणांगणात कोणतीही कसर सोडायची नाही, असा पवित्रा घेतला आहे. गणेशोत्सवाच्या थाटात शिंदे सेनेचा हा शक्तीप्रदर्शनाचा डंका विरोधकांना कातर करणारा ठरेल का? की विरोधक नव्या जोमाने मैदानात उतरतील? येत्या काही महिन्यांत याचे उत्तर मिळेल, पण सध्या तरी शिंदे सेनेचा गणपती बाप्पा आणि जनतेच्या मनावर एकाचवेळी अधिराज्य गाजवताना दिसतो आहे.
