चंद्रपूरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वादविवाद तीव्र झाला आहे. भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कसंगोट्टुवार यांनी आप पक्षाचे मंत्री संतोष बोप यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आग आता चांगलीच पेटली आहे. राजकीय नेते एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवताना दिसत असताना, चंद्रपूर जिल्ह्यात मात्र ही लढाई आता धमकीच्या तालावर पोहोचली आहे. एका बाजूला सत्ताधारी भाजप आणि दुसऱ्या बाजूला आम आदमी पक्ष यांच्यातील वादाने आता नवा रंग पकडला आहे. आप पक्षाचे शहर संघटन मंत्री संतोष बोपचे यांनी सोशल मीडियावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना काम करा, ढोंग करू नका असे सुनावले होते. त्यानंतर चंद्रपूर भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कसंगोट्टुवार यांनी थेट धमकीच दिली. या प्रकरणाने आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आप पक्षाने या प्रकरणाला गंभीरतेने घेत पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कसंगोट्टुवार यांनी संतोष बोपचे यांना फोन करून धमकी दिल्याचा आरोप आहे. तुम्ही बावनकुळे यांच्या पोस्टवर टिप्पणी केली, आमच्याशी गोंधळ करू नका. मी तुम्हाला माझी दुसरी बाजू दाखवीन. हिम्मत असेल तर पोलिसांकडे जा, अशा धमक्या त्यांनी दिल्याचे आप पक्षाने म्हटले आहे. या धमकीने आप पक्षाने थेट लोकशाही आणि कायद्याचा अपमान झाल्याचा आरोप केला आहे. आम्ही अशा धमक्यांना घाबरणार नाही, जनता निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवेल, असे आपने ठणकावले आहे.
सोशल मीडियावर राजकीय वाद
कसंगोट्टुवार यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडताना म्हटले आहे, सोशल मीडियावर घाणेरड्या टिप्पण्या करणे चुकीचे आहे. सन्मानाने जगावे, ही माझी भूमिका आहे. कोणाला काही अडचण असेल तर थेट सांगा, पण अशा अपशब्दांचा वापर चुकीचा आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही कसंगोट्टुवार यांनी सोशल मीडियावर त्यांच्याच कार्यकर्त्यांना असाच इशारा दिला होता. ज्यामुळे ते चर्चेत आले होते. पण यावेळी त्यांनी थेट आपच्या नेत्याला धमकी दिल्याचा आरोप आहे, ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. आप पक्षाने या प्रकरणावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. चंद्रपूरातील जनता रस्त्यांवरील खड्डे, पाण्याची टंचाई, आणि रुग्णालयांमधील औषधांचा तुटवडा यांनी त्रस्त आहे. पण सत्ताधारी भाजप नेते या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्यांना धमकावत आहेत, असा आरोप आप पक्षाने केला आहे.
पक्षाने पुढे म्हटले आहे की, कसंगोट्टुवार यांनी यापूर्वी एका ज्येष्ठ नागरिकावर हात उचलला होता. हे जनता विसरलेली नाही. जर तुम्ही सत्य बोलणाऱ्यांना धमकावाल, तर आम्ही तुमच्या डोळ्यात जनतेच्या समस्यांचे पावडर टाकू आणि तुमच्या कानात जनतेच्या रागाचा बॉम्ब फोडू. हा वाद आता निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आप पक्षाने स्पष्ट केले आहे की, धमक्यांना घाबरून आम्ही मागे हटणार नाही. जनता हीच आमची ताकद आहे. तीच निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवेल. दुसरीकडे, कसंगोट्टुवार यांच्या धमकीमुळे भाजपची प्रतिमा डागाळण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर पोलिस काय कारवाई करतात, याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
