महाराष्ट्र

Prashant Padole : उडविणार म्हणजे सत्तेबाबत बोललो

Bhandara : मोदी, फडणवीस यांच्याबाबत विधानावर स्पष्टीकरण

Post View : 30

Author

काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहेत. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमुळे वादळ निर्माण झाले आहे.

भंडारा, गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे पुन्हा चर्चेत आले आहेत. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पडोळे यापूर्वी दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी कारच्या बोनेटवर बसून त्यांनी काढलेला व्हिडीओ टिकेचा पात्र ठरला होता. यावेळी खासदार पडोळे हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वादात सापडले आहेत.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासंदर्भात पडोळे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना पडोळे म्हणाले की, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही तर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना उडवून देऊ. पडोळे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मारण्याची भाषा पडोळे कसे करू शकतात अशी टीका त्यांच्यावर सुरू झाली.

Local Body Election : घड्याळाची टिकटिक सुरू, लवकरच तारखांची घोषणा 

बावनकुळे यांचा पलटवार

पडोळे यांच्या विधानाचा भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी समाचार घेतला. त्यापैकी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पडोळे यांच्यावर टीका केली. बावनकुळे म्हणाले की, प्रशांत पडोळे हे अपघाताने खासदार झाले आहेत. राजकारणाबाबत कुठे काय बोलायचे हे त्यांना कळत नाही. आपल्या विधानावर टीका सुरू झाल्यानंतर प्रशांत पडोळे यांनी आपण नेमके काय बोललो याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

उडवून देण्याचा अर्थ कोणालाही जीवाने मारण्याचा होत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर शेतकरीच मोदी आणि फडणवीस यांना सत्तेवरून उडवून देतील, असे बोलण्याचा आपला तात्पर्य होता. मात्र आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असे पडोळे म्हणाले. सरकार अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 18 ते 20 रुपये देत आहे. एवढ्या पैशांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे ही त्यांची थट्टा आहे. आपण केव्हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या. शेतकऱ्यांबाबत असलेले धोरण सरकारने बदलावे, अशी मागणी केली.

शेतकऱ्यांना कोणतेही सरकार जर न्याय देत नसेल तर असे सरकार उलथवून टाकण्याचे म्हणजेच उडवण्याची ताकद त्यांच्यात असते. आपण पूर्व विदर्भातील असल्याने त्या प्रदेशातील बोलण्याच्या पद्धतीची झलक प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसली. मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे पडोळे म्हणाले. भारतामध्ये सगळे काही संविधान आणि लोकशाहीच्या आधारावर चालते. इथे कोणीही कोणाला उडवून देऊ शकत नाही. पण मतदार मात्र चिडला तर कोणालाही सत्तेवरून उडवून देऊ शकतो. त्यामुळे सरकारने सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, असे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी पुन्हा स्पष्ट केले.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!