
महसूल मंत्री म्हणून देवाभाऊंच्या सरकारमध्ये सहभागी होताच चंद्रशेखर बावनकुळे हे कामाला लागले आहेत. आपली होमपीच असलेल्या नागपूरमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली आहे.
महायुतीच्या सरकारचे नवीन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तातडीने कामाला लागले आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला स्वप्नातील घर उभारताना सगळ्यात मोठ्या प्रमाणावर गरज भासते ती वाळूची. राज्यभरातील वाळूचे दर नियंत्रणात राहतील यासाठी उपाय करणार असल्याचे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. नागपूर येथे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर महसूल कार्यालयांच्या रचनेबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे यावेळी ते म्हणाले. सर्वसामान्यांनी दिलेल्या विश्वासाशी अधिक कटीबद्धता असल्याचे त्यांनी जाहीर केले. महसूल विभागामध्ये बदली सत्र नेहमीच चर्चेत असते. या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.nकोणत्याही परिस्थितीत नियमाच्या बाहेर बदल्या होणार नाहीत, असे त्यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे.

नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल विभागातील विविध योजनांचा आढावा घेतला. त्यांनी प्रशासनाची कार्यपद्धती अधिक गतिमान करण्यासाठी सूचना दिल्या. जनतेच्या गरजा व अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी तत्पर प्रशासनाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य जनतेने आम्हाला जबाबदारी दिली आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून, प्रशासनाने साध्या-साध्या गरजांसाठीही लोकांना अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले.
प्रशासन Responsible
लोकांना रिस्पॉन्स अर्थात प्रतिसाद देणारे आणि रिस्पॉन्सिबल अर्थात जबाबदारी स्वीकारणारे प्रशासन गरजेचे आहे. महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रश्न ग्रामीण भागातील जनतेसाठी महत्त्वाचे असतात. तलाठी कार्यालयापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत प्रशासनाला जलद काम करावे लागेल. परिणामकारक सेवा पुरवावी लागेल. प्रशासकीय यंत्रणेने आपली जबाबदारी वेळेत पूर्ण करण्यासाठी कार्यपद्धती सुधारण्याचे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
प्रशासनासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला. ज्या विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे, तिथे समतोल साधण्यावर काम करू. कोणत्याही परिस्थितीत शासकीय नियम डावलून सोयीच्या ठिकाणी बदल्या होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाच्या विविध योजनांची सद्य:स्थिती आणि अंमलबजावणी याचा सादरीकरणाद्वारे आढावा घेण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सविस्तर माहिती दिली.
बैठकीला अपर महसूल आयुक्त डॉ. माधवी खोडे, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे आणि अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते. गोरगरिबांसाठी घरकुल योजनांचा लाभ अधिक प्रभावी करण्याची सूचना बावनकुळे यांनी दिली. त्यासाठी आवश्यक संसाधने पुरवण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून अहवाल मागवला.
‘कंत्राटी’साठी योजना
महानिर्मितीसारख्या शासकीय उपक्रमांतर्गत कार्यरत कंत्राटी कामगारांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी नागपूर येथे प्रायोगिक तत्वावर योजना राबविण्याचा मानस बावनकुळे यांनी व्यक्त केला. एनएमआरडीए, महानिर्मिती आणि बँकांनी यासाठी संयुक्त करार केला आहे. महादूला येथे कामगारांसाठी आवास योजना उभारण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीनंतर महसूल मंत्री यांनी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंत्री बावनकुळे यांना प्रशासकीय कामकाजाची माहिती दिली.