उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. बाप्पांच्या स्वागतात रंग उधळले जात असताना, राजकीय वर्तुळातही चांगलाच रंग खेळला जात आहे. गणपती बाप्पांच्या आगमनाने मुंबई, ठाणे, कोकणासह संपूर्ण राज्यात जल्लोष आहे. पण राजकीय नेत्यांच्या गाठीभेटींनी यंदाचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने चर्चेत आला आहे. विशेषतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या बड्या नेत्यांनी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यांनी राज ठाकरेंच्या घरी दर्शन घेतल्यानंतर मिश्कील पण तितक्याच सूचक प्रतिक्रिया देऊन सगळ्यांना विचारात टाकले.
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनीही शिवतीर्थवर हजेरी लावली. पण खरी गंमत तर तिथून पुढे सुरू झाली. शिंदे यांनी, ‘राज की बात राझही रहने दो’ असं म्हणत राजकीय सस्पेन्स वाढवला. त्यांच्या या वक्तव्यातून एकच गोष्ट स्पष्ट झाली. शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील स्नेह आता फक्त गणपती दर्शनापुरता मर्यादित नाही, तर त्यामागे काहीतरी मोठे राजकारण दडले आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोमणा मारत, काही लोकांना आता स्नेहसंबंध आठवत आहेत. पण आमचा स्नेह तर आधीपासून आहे, असेही ते म्हणाले.
राजकीय सस्पेन्स वाढले
आता हे स्नेहाचे भोजन कधी होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान, ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधूंच्या गाठीभेटींनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. सलग दोन दशकांनंतर 5 जुलै 2025 रोजी या बंधूंनी एकत्र येत ऐतिहासिक क्षण निर्माण केला. पण तरीही सत्ताधाऱ्यांना त्याचा काही फरक पडला नाही, असं दिसतंय. नुकत्याच झालेल्या मुंबईतील निवडणुकीत ठाकरे बंधूंना पराभव स्वीकारावा लागला. पण यानंतरही ठाकरे बंधूंची युती आणि आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याचे संकेत यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
महायुतीला यामुळे विशेषतः भाजप आणि शिंदे गटाला चांगलाच फटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे. पण यात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती एकनाथ शिंदेंच्या हालचालींची. शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरी गणपती दर्शनाच्या निमित्ताने भेट देताना जे सूचक वक्तव्य केले, त्याने सगळ्यांचे कान टवकारले. आमच्यात जी चर्चा झाली, ती खाजगीच राहू द्या, असं म्हणत त्यांनी राजकीय खेळात आपले वेगळे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे, यापूर्वी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत विचारले असता शिंदे यांनी, मला विकास कामांबाबत विचारा, असे रागाने सांगितले होते. पण आता त्यांनी उद्धव ठाकरेंना टोमणा मारत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ShivSena : गणरायाच्या मंडपातून मतदारांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मास्टरप्लॅन
