अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड होताच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हटके अंदाजात कवितेच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या पदासाठी महायुतीच्या वतीने फक्त त्यांचाच अर्ज दाखल झाला होता, जो वैध ठरवण्यात आला. त्यांच्या निवडीचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आणि त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले. विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी तीन नावे चर्चेत होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक अण्णा बनसोडे यांची वर्णी लागली.
अण्णा बनसोडे यांच्या राजकीय प्रवासाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. अण्णा बनसोडे यांच्या निवडीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनोख्या शैलीत त्यांना कविता स्वरूपात शुभेच्छा दिल्या आहेत. ‘पुरी हो गई दादा की तमन्ना, उपाध्यक्ष पद पर बैठ गया अण्णा’ त्यांच्या या हटके अंदाजाने संपूर्ण सभागृह आंनदाने हसले. यशाबद्दल विधानसभेतही चर्चा झाली आणि त्यांच्या प्रवासाची आठवण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून दिली.
राजकीय संघर्ष
अण्णा बनसोडे यांचा प्रवास कठोर राहिला आहे. अगदी सामान्य कुटुंबात जन्मलेले बनसोडे यांनी संघर्षाच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले. पान टपरीवर काम करणाऱ्या एका व्यक्तीने विधिमंडळ सदस्यत्व मिळवले आणि आता तोच व्यक्ती उपाध्यक्षपदावर पोहोचला आहे. त्यांच्या जिद्दीचा आणि मेहनतीचा हा प्रवास अनेकांसाठी मार्गदर्शक आहे, असे पवारांनी सांगितले.
त्यांच्या निवडीवेळी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, ‘गुलाबराव पाटील यांच्यासारखाच अण्णा बनसोडे यांचा प्रवास आहे. कधीकाळी पानाची टपरी चालवणारा माणूस आता मोठ्या जबाबदारीच्या पदावर पोहोचला आहे.’ विधानसभेत त्यांचे जसे कौतुक झाले, तसेच त्यांची मेहनतही सर्वांसमोर आली.
महापालिकापासून सुरुवात
अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन वेळा आमदार राहिले. 2009 मध्ये पहिल्यांदा आमदारपदी विराजमान झाले. 2014 मध्ये पराभव झाला असला तरी 2019 आणि 2024 विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला. पक्षातील फूट पडल्यावरही त्यांनी अजित पवार यांची साथ कायम ठेवली. ‘पिंपरीचे शिलेदार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बनसोडे यांनी आपल्या मतदारसंघात मजबूत पकड राखली आहे.अण्णांचा राजकीय प्रवास महापालिकेपासून सुरू झाला.
पान टपरीचा व्यवसाय करत असताना 1997 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आणि 2002 मध्ये पुन्हा विजयी झाले. स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवताना त्यांचा अजित पवार यांच्याशी संपर्क वाढला आणि ते त्यांच्या निकटवर्तीयांपैकी एक झाले. विशेष म्हणजे, जिथे त्यांची पान टपरी होती, त्याच ठिकाणी त्यांनी जनसंपर्क कार्यालय उभारले. राजकीय प्रवास पुढे सुरूच राहिला आणि आता ते महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत.
