
भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी समाजवादी पक्षाच्या हिंदूविरोधी वक्तव्यांचा तीव्र निषेध केला. त्यांनी जनतेला सत्य ओळखून योग्य उत्तर देण्याचे आवाहन केले.
समाजवादी पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने होत असलेल्या हिंदू धर्मरक्षक राजांच्या अवहेलनांवर भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक करत छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर आता सपा खासदार रामजी लाल सुमन यांनी महाराणा संग्राम सिंह राणा सांगा यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. परिणय फुके यांनी या वक्तव्याचा जोरदार निषेध करत सपाच्या हिंदूविरोधी मानसिकतेवर हल्ला चढवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत नवी उंची गाठत आहे, मात्र काही राजकीय पक्षांना ही प्रगती डोळ्यात खुपते. त्यामुळे देशात धार्मिक तेढ निर्माण करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आता जनता सुजाण झाली आहे. विकास आणि दिशाभूल यातला फरक तिला स्पष्ट समजतो, असेही परिणय फुके यांनी ठामपणे सांगितले.

अवमान करणाऱ्यांना धडा
परिणय फुके यांनी सपाच्या नेत्यांना स्पष्ट इशारा देत सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रताप आणि राणा सांगा यांच्यासारख्या राष्ट्ररक्षक योद्ध्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. या महापुरुषांनी भारताच्या संस्कृती आणि इतिहासात अभिमानास्पद स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या विरुद्ध अवमानकारक विधाने करणे म्हणजे राष्ट्राचा अपमान आहे, असे ते म्हणाले.
हिंदू राजांची सातत्याने अवहेलना करण्याचे काम समाजवादी पक्षाने सुरू केले आहे. हिंदू संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा वारसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अधिक दृढ होत आहे, आणि हेच विरोधकांना सहन होत नाही. मात्र, या राष्ट्रविरोधी विचारसरणीला जनता लवकरच कडाडून उत्तर देईल, असा विश्वास फुके यांनी व्यक्त केला.
भाजपचा ठाम निर्धार
परिणय फुके यांनी देशाच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना असेही नमूद केले की, देशाची उभारणी आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी काही पक्ष समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजवादी पक्षाचा हा प्रवास विरोध, दिशाभूल आणि धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा आहे, जो देशाच्या भविष्यासाठी घातक ठरू शकतो.
परिणय फुके यांनी ठामपणे सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार हिंदू महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही. सपा नेत्यांनी जर असे वक्तव्य सुरूच ठेवले, तर त्यांना जनता लवकरच योग्य जागा दाखवेल. देशाच्या प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही शक्तींना जनता कधीच माफ करणार नाही.
Parinay Fuke : विधान परिषदेत अनधिकृत बांधकामाचा मुद्दा गाजला