महाराष्ट्र

Yavatmal : पोलिसांनी रचला सापळा अन् उघडकीस आणला रेशन धान्यघोटाळा

Ration Grain Scam : गोंदियाच्या दिशेने जात असताना रस्त्यातच धरला ट्रक 

Author

सरकारच्या ऑनलाईन वितरण प्रणालीच्या दाव्यांना धक्का देणारी घटना यवतमाळमध्ये उघडकीस आली आहे. लाखो रुपयांचा रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात गोंदिया येथे पाठवला जात असतानाच पोलिसांनी सापळा रचून ट्रक जप्त केला.

सरकारी योजनेखाली गरिबांना दिला जाणारा रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विकला जातो, हा आरोप नाकारत पुरवठा विभाग सतत दावा करत होता की, ऑनलाईन वितरण प्रणालीमुळे अशा प्रकारांना आळा बसला आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आलेल्या एका मोठ्या कारवाईने या दाव्यांना जोरदार हादरा दिला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत तब्बल 57 लाख 64 हजार 200 रुपयांचा रेशनचा तांदूळ पकडण्यात आला आहे. तो गोंदिया जिल्ह्यात विक्रीसाठी जात होता. विशेष म्हणजे गोंदिया हे आता रेशन तांदळाच्या काळ्या बाजारातील ‘हब’ म्हणून उदयास येत असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथून आर्णी मार्गे गोंदिया येथे एक ट्रक रेशनचा तांदूळ घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या आधारे मनदेव घाट परिसरात सापळा रचण्यात आला. ट्रक क्रमांक MH 29 BE 8532 पकडण्यात आला. तपासणी दरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर तांदूळ आढळून आला.

तहसीलदाराचा अहवाल

पोलीसांनी ट्रकचालक व त्याच्या सहकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कोणतेही वैध कागदपत्रे किंवा रशीद नसल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि ट्रकसह तांदूळ जप्त करण्यात आला. तांदूळ नेमका कुठल्या स्त्रोताचा आहे, याबाबत यवतमाळ तहसीलदारांकडून अहवाल मागवण्यात आला. अहवालात तांदूळ सरकारी रेशनचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शेख मोहसीन शेख कादर ( वय 34, देऊरवाडी पुनर्वसन, दिग्रस) आणि हाफीज बेग सनाउल्ला बेग (34, बाराभाई मोहल्ला, दिग्रस) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या या कारवाईने एक मोठा प्रकार समोर आला आहे. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ खरेदी-विक्रीसाठी पोहचवला जातो. यासाठी एक सुसंगत साखळी कार्यरत असून त्यामध्ये स्थानिक राशन दुकानदार, व्यापारी, राईस मिल चालक, अधिकारी यांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही यवतमाळ जिल्ह्यातून गोंदिया येथे पाठवला जाणारा रेशनचा तांदूळ पकडण्यात आला होता. त्यामुळे हे प्रकरण केवळ एकट्या आरोपींपुरते मर्यादित नाही. तर एका मोठ्या रेशन तांदूळ घोटाळ्याचे संकेत देणारे ठरत आहे. याच्या तपासाची साखळी गोंदियात पोहचल्यास, अनेक दिग्गजांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

गरिबांपर्यंत पोहोचण्याऐवजी काळाबाजार

महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय संतोष मनवर व त्यांच्या टीमने केली. त्यांच्या पथकात योगेश गटलेवार, अजय डोळे, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, नीलेश राठोड, रितुराज मेडवे, आकाश सहारे यांचा सहभाग होता. सरकारी यंत्रणेवर जनतेचा विश्वास असेपर्यंत अशा प्रकरणांना आळा बसणं कठीण आहे. रेशनचा तांदूळ गरीबांपर्यंत पोहोचण्याऐवजी काळ्या बाजारात जात असेल, तर हा प्रशासकीय अपयशाचा मुद्दा बनतो. या प्रकरणाच्या सखोल चौकशीद्वारे दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा गोंदिया-पासून संपूर्ण विदर्भात रेशन घोटाळ्याचा स्फोट होण्यास वेळ लागणार नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!