
नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते स्वस्ति निवास या निवासगृहाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला.
नागपूरच्या भूमीवर आज एक आगळावेगळा सोहळा पार पडला. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये स्वस्ति निवास पंथागार या कॅन्सर पीडित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठीच्या निवासगृहाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल मनापासून कौतुक करत, त्यांचे कार्य म्हणजे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी असल्याचं म्हटलं.
अमित शाह म्हणाले की, देवेंद्रजी आणि त्यांच्या टीमने फक्त एक प्रकल्प उभारला नाही, तर त्यांनी सेवा, संवेदना आणि धैर्य याचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. फडणवीस आणि त्यांचे मित्र शैलेश जोगळेकर या दोघांच्या कुटुंबात कॅन्सरमुळे दुखद प्रसंग आले. मात्र त्यांनी त्या दुःखाला सार्वजनिक सेवेचं रूप दिलं. हजारो गरजूंसाठी आशेचा किरण बनले.

नातेवाईकांसाठी संवेदना केंद्र
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट हे मुख्यमंत्री फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. 2012 साली त्यांच्या वडिलांच्या कॅन्सरमुळे झालेल्या निधनानंतर त्यांनी नागपूरसह संपूर्ण मध्य भारतातील रुग्णांसाठी एक आधुनिक, चॅरिटेबल आणि माणुसकीने भरलेलं हॉस्पिटल उभं करण्याचं स्वप्न पाहिलं. हे स्वप्न टप्प्याटप्प्याने आकार घेत गेलं. एप्रिल 2023 पासून हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कार्यरत झालं. या संस्थेच्या माध्यमातून आज हजारो गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत आहेत. या सेवाभावाच्या केंद्रामागे केवळ वैद्यकीय दृष्टीकोन नाही, तर मानवतेचा गाभाही आहे.
भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने स्वस्ति निवास या पंथागाराची संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. अनेक वेळा रुग्णांइतकंच दुःख त्यांच्या नातेवाईकांनाही भोगावं लागतं. उपचाराच्या काळात त्यांचे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक संघर्ष वाढतात. यासाठी स्वस्ति निवास हे निवासगृह एक समर्पित आश्रयस्थान ठरेल, असं अमित शाह यांनी आपल्या भाषणात नमूद केलं. पश्चिमी देशांमध्ये जेव्हा एखादा रुग्ण आजारी पडतो, तेव्हा त्याला केवळ हॉस्पिटलवर सोपवलं जातं. मात्र भारतात रुग्णाचं संपूर्ण कुटुंब त्याच्या उपचार प्रक्रियेत सामील असतं. स्वस्ति निवास ही संकल्पना याच भारतीय मूल्यांची साक्ष देणारी आहे.
समाजसेवेच्या व्रताची पायाभरणी
अमित शाह यांनी सांगितलं की, जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या हातात कोणतंही पद नव्हतं. तरीही त्यांनी या कार्याला सुरुवात केली, हेच त्यांच्या संकल्पशक्तीचं उदाहरण आहे. आज ही संस्था हजारो रुग्णांचे दुःख हलकं करत आहे. कोणताही मोबदला न मागता, निस्वार्थ भावनेने समाजासाठी काहीतरी देणं, हीच खरी सेवा आहे. आज या सेवाभावाच्या कार्याला संपूर्ण देशात आदर्श मानलं जातंय. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि त्याचं विस्तार स्वरूप असलेला स्वस्ति निवास हे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत जे महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या आरोग्यसेवेला नवा मार्ग दाखवतात.
कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरच्या भूमीवर केवळ एक निवासगृहाचं भूमिपूजन झालं नाही, तर एक नवा आदर्श, एक नवा विचार आणि एक नवी दिशा साकार झाली. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने आपल्या व्यक्तिगत दुःखाला सामोरे जात सेवा धर्माच्या माध्यमातून समाजहितासाठी कार्य करण्याचं व्रत घेतलं. या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. ही प्रेरणा भविष्यात आणखी अशाच संस्था उभ्या करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. अमित शाह यांच्या उपस्थितीने या सोहळ्याचं महत्त्व अधिक वाढलं. त्यांच्या तोंडून मिळालेलं कौतुक मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्याला मिळालेली एका प्रकारची सामाजिक मान्यता ठरली. नागपूरच्या भूमीवर आज सेवा, संवेदना आणि श्रद्धेचा एक नवीन अध्याय लिहिला गेला.