
नागपूर मेट्रो फेज-1 नंतर आता मेट्रोच्या फेज-2 प्रकल्पाला विस्तार मिळाला आहे. प्रकल्पातील काही स्थानकांवरील पायलिंग काम पूर्ण झाले आहे. या विस्तारामुळे नागपूर शहर व उपनगरांमध्ये प्रवास सोपा, जलद आणि शाश्वत होईल.
नागपूरकरांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. नागपूर महा मेट्रो प्रकल्पाच्या फेज-2 मध्ये आता नवा टप्पा गाठला आहे. 2019 मध्ये मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे औपचारिक उद्घाटन झाले. पहिल्या टप्प्यातील दोन मार्ग उत्तर-दक्षिण (ऑरेंज लाईन) आणि पूर्व-पश्चिम (अॅक्वा लाईन) यशस्वीपणे कार्यान्वित झाले आहेत. ऑरेंज लाईन ही ऑटोमोटिव्ह स्क्वेअर पासून खापरी पर्यंत धावते. तर अॅक्वा लाईन प्रजापती नगर ते लोकमान्य नगर या दरम्यान प्रवासाची सुविधा देते. या दोन मार्गांनी नागपूर शहरातील लाखो प्रवाशांना सुलभ, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय दिला आहे. शहराचा विकास यावरच थांबायचं नव्हतं. आता शहराचा विस्तार अधिक व्यापक केला जातोय.
महा मेट्रोने फेज-2 कामात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. कामठी रोड मार्गावरील तीन महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांवर पिवळी नदी, ऑल इंडिया रेडिओ आणि लोक विहार येथे पायलिंग म्हणजेच जमिनीखालील पाया मजबूत करण्याचं काम शंभर टक्के पूर्ण झालं आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, पिवळी नदी स्थानकावर 148 पैकी 148 पायली, ऑल इंडिया रेडिओवर 122 पैकी 122 पायली आणि लोक विहार स्थानकावर 140 पैकी 140 पायली यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या. हे काम फेज-2 साठी एक बळकट पाया सिद्ध होतंय. ज्यामुळे पुढील उभारणी अधिक वेगाने होईल.
ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान या Reach-2A विभागातील इतर कामे देखील वेगात सुरू आहेत.

BJP Vs Congress : अकोल्यात पावसाचा थैमान अन् स्पर्धेची राजकीय ढगफुटी
कनेक्टिव्हिटी वाढेल
आतापर्यंत 68 टक्के पिअर (स्तंभ) बांधणी, 77 टक्के पाईल कॅप, 40 टक्के सेगमेंट कास्टिंग आणि 26 टक्के स्पॅन इरेक्शन पूर्ण झालं आहे. या आकडेवारीने दाखवून दिलं आहे की, नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा ठाम पावलांनी पुढे सरकत आहे. नागपूर मेट्रो फेज-2 अंतर्गत एकूण 43.8 किलोमीटर अंतरावर चार मुख्य मार्गांवर 32 स्थानकांचं जाळं उभारलं जात आहे. हे विस्तार नागपूर शहराच्या उपनगरांपर्यंत मेट्रो सेवा पोहोचवतील. या टप्प्यात खापरी ते एमआयडीसी ईएसआर (18.5 किमी, 10 स्थानके), प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर (5.6 किमी, 3 स्थानके), ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान (13 किमी, 12 स्थानके) आणि लोकमान्य नगर ते हिंगणा (6.7 किमी, 7 स्थानके) हे चार मार्ग प्रस्तावित आहेत.
मेट्रोच्या या विस्तारामुळे नागपूरच्या उपनगरांपर्यंत मेट्रो सेवा पोहोचेल, कनेक्टिव्हिटी वाढेल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि शाश्वत शहरी विकासाला चालना मिळेल. नागपूर मेट्रो स्थानकांवर केवळ प्रवासाचीच सोय नाही, तर सामाजिक जाणीवही आहे. सर्वांसाठी मेट्रो या आदर्शांशी बांधील राहून, बालसंगोपन सुविधा, सीसीटीव्ही निगराणी, अपंग प्रवाशांसाठी अनुकूल रचना, मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट सुविधा या आधुनिक गोष्टींनी ही स्थानके सजली आहेत.फेज-2 कामाचा वेग आणि दर्जा पाहता हे निश्चितपणे सांगता येईल की नागपूर मेट्रो केवळ शहराचं नव्हे तर संपूर्ण विदर्भाच्या गतिशीलतेचं प्रतीक बनत चालले आहे. ही मेट्रो नागपूरच्या भविष्यासाठी एक स्वप्नवत आधारस्तंभ ठरेल अशीच अपेक्षा आहे.