महाराष्ट्र

Narendra Bhondekar : स्वबळाच्या दाव्यानंतर महायुतीने करून दिली आठवण 

Mahayuti : कुणामुळे निवडून न आल्याच्या विधानावरून नाराजीनाट्य 

Author

भंडारा आणि गोंदिया जिल्हामध्ये महायुतीने विधानसभा निवडणूक ताकतीने लढली. सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालत विजय मिळविला. पण आता स्वबळाच्या दाव्यामुळे महायुती मधील कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी पसरली आहे.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोर धरू लागले आहेत. त्यानंतरही पुन्हा एकदा 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची चर्चा चांगलीच गाजू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या चर्चांना विशेष गती मिळाली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील राजकारण सध्या नव्याने गती घेत आहे. भंडारा शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्रकार परिषदेनंतर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील राजकारणामध्ये नवे वादळ निर्माण झाले आहे. सध्या त्यावरून सोशल मीडियामध्ये पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत.

 

आपण कुणाच्याही भरोशावर विधानसभा निवडणुकीत विजयी झालेलो नाही, असा दावा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर महायुतीमधील कार्यकर्त्यांनी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. ज्यामध्ये माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे महायुतीच्या मेळाव्यामध्ये नरेंद्र भोंडेकर यांना विजयी करण्यासाठी ताकदीने काम करा, असे आवाहन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महायुती मधील कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी पसरल्याची चर्चा भंडारा आणि गोंदियाच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे.

Nagpur : सत्तेचा सूड; एका तक्रारीचा मोबदला ठरला मृत्यू

 

राजकीय तापमान वाढले

 

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याशी जवळीक साधली आहे. आमदार भोंडेकर यांनी देखील काँग्रेसच्या या सादाला प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे. यासंदर्भात निवडणूक काळात एका प्रचार सभेचा व्हिडीओ देखील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केलेला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे निवडणूक चिन्ह वापरण्यात आले आहे. त्यात आमदार डॉ. परिणय फुके एका सभेला संबोधित करताना दिसत आहेत.

 

व्हिडीओमध्ये माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे आमदार भोंडेकर यांना विजयी करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील महायुतीमध्ये वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामध्ये वातावरण ताप तापल्याचे जाणवत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील हा नवीन राजकीय वाद नक्की कोणत्या वळणावर जाईल आणि त्याचे पडसाद निवडणुकीवर कसे उमटतील, हे पाहणे निश्चितच औत्सुक्याचे ठरणार आहे. आमदार भोंडेकर यांनी केलेला दावा आणि त्यानंतर व्हायरल झालेला व्हिडीओ यामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील राजकारणात कोणता नवीन अध्याय लिहिला जातो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Shiv Sena : राज ठाकरेंचा गुलदस्ता ‘मातोश्री’वर की ‘डीसीएम’ बंगल्यावर?

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!