महाराष्ट्र

Parinay Fuke : दादांनी शिवधनुष्य पुन्हा पेललं अन् विरोधकांना नमवून ठेवलं 

Gondia : 13 वर्षांचा वनवास आणि सहकारात डॉ. फुके बनले विजयगाथेचे सूत्रधार

Post View : 32

Author

13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोंदिया सहकार रणभूमीत महायुतीने पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकावला. या विजयानंतर भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या दूरदृष्टी आणि समन्वयातून सहकारात नवा इतिहास रचला.

राजकारणात संयम, विचारात ठाम भूमिका आणि कृतीत रणनीती असलेले नेतृत्व जिथे कार्यरत असते, तिथे विजय हे केवळ नियतीचं नव्हे, तर नियोजनाचं फलित असतं. असाच एक आदर्श उदाहरण म्हणजे भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव पदाच्या निवडणुकीत महायुतीच्या ‘सहकार पॅनल’ला विजय मिळाला. हा मिळालेला जबरदस्त विजय हा केवळ एक निवडणूक निकाल नव्हता, तो एक विश्वासाचा गगनभरारी होता. या विजयाच्या केंद्रस्थानी राहिले ते म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि आमदार डॉ. परिणय फुके.

13 वर्षांच्या दीर्घ अंतरानंतर पार पडलेल्या या अत्यंत महत्वाच्या निवडणुकीत, डॉ. फुके यांनी फक्त मार्गदर्शकाची भूमिका निभावली नाही, तर एक कवच म्हणून संपूर्ण महायुतीच्या उमेदवारांभोवती आपले कुशल संघटन बांधले. त्यांच्या तटस्थ आणि समन्वयवादी नेतृत्वामुळे गोंदिया जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राजेंद्र जैन विराजमान झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी भेरसिंग नागपुरे आणि सचिवपदी अजय हलमारे यांची एकमताने निवड झाली.

महायुतीचा ध्वज उंचावला 

संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये डॉ. परिणय फुके हे गोंदियातच उपस्थित राहून सर्व उमेदवारांचे समन्वय साधत राहिले. त्यांची उपस्थिती म्हणजे कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा आणि समर्थकांसाठी आत्मविश्वास ठरली. त्यांनी आधीच दावा केला होता की, राजेंद्र जैन हेच अध्यक्ष होतील आणि तो दावा त्यांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवला. या निवडणुकीत ‘सहकार पॅनल’चे सर्व तीन उमेदवार राजेंद्र जैन, भेरसिंग नागपुरे आणि अजय हलमारे यांना प्रत्येकी 14 मते मिळाली. तर काँग्रेसच्या ‘परिवर्तन पॅनल’चे उमेदवार जीतू कटरे, अशोक गुप्ता आणि गंगाधर परशुरामकर यांना प्रत्येकी केवळ 6 मतेच मिळाली.

विशेष म्हणजे, 20 संचालकांच्या निवडणुकीत सहकार पॅनलने 11 जागा मिळवल्या होत्या. 7 जागा परिवर्तन पॅनलकडे आणि 2 जागा अपक्ष उमेदवारांकडे होत्या. मात्र अजय हलमारे आणि पंकज यादव या दोघा अपक्षांनी सहकारला समर्थन दिले आणि यंदाच्या निर्णायक निवडणुकीत परिवर्तन पॅनलमधील एक संचालकही सहकारकडे वळला.

Parinay Fuke : घंटा वाजली शिक्षण विभागाची, कारण आमदार बोलले पूर्व विदर्भासाठी

नवे समीकरण

या निवडणुकीत एक वेगळी बाब म्हणजे महायुतीचे प्रत्यक्षात झालेले आघाडीचे यशस्वी प्रयोग. अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, उपाध्यक्षपद भाजपकडे आणि सचिवपद शिवसेनेच्या सहयोगींकडे देत डॉ. फुके यांनी तीनही पक्षांमध्ये जबरदस्त ‘पॉवर शेअरिंग’ साधले. हा समन्वय हा त्यांच्या दूरदृष्टीचा नमुना आहे.

या यशानंतर अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी स्वतः डॉ. फुके यांचा भगव्या शालीने सत्कार केला. यावेळी त्यांनी सांगितले की, जर कोणीतरी सतत प्रेरणा दिली, दिशा दाखवली आणि संघर्षात पाठीशी उभा राहिला असेल, तर ते डॉ. फुके आहेत. या यशाच्या पार्श्वभूमीवर फुके यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन करत विश्वास व्यक्त केला की, गोंदिया जिल्हा सहकारी बँक आता शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्या जोमाने कार्य करेल.

नव्या पर्वाची सुरुवात

या विजयामुळे गोंदिया जिल्ह्यात महायुतीच्या सहकार क्षेत्रातील पकड आणखी बळकट झाली आहे. शेतकरी, महिला बचतगट, उद्योजक आणि सर्वसामान्य खातेदारांच्या हितासाठी एक नवी उमेद तयार झाली आहे. सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक व्यवहारांचं केंद्र नसून ते सामाजिक पुनर्रचनेचं माध्यम आहे आणि हे भान राखत डॉ. फुके यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनलने आता नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!