महाराष्ट्र

Akola : पट्टे, प्रमाणपत्र आणि परिवर्तन, महसूल सप्ताहाचा नवसंकेत

Ajit Kumbhar : तक्रारींपासून अधिकारांपर्यंतचा प्रवास एका आठवड्यात

Post View : 41

Author

महसूल विभाग आता जनतेच्या दारात पोहोचत असून 1 ऑगस्टपासून अकोल्यात ‘महसूल सप्ताह’ साजरा होणार आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या नेतृत्वात हा सप्ताह लोकाभिमुख सेवांचा जागर ठरणार आहे.

अकोल्यात प्रशासनाचा चेहरा अधिक पारदर्शक आणि जनतेच्या अधिक जवळ आणण्यासाठी महसूल विभागाकडून 1 ऑगस्टपासून ‘महसूल सप्ताह 2025 वर्षाचा प्रारंभ होत आहे. हा सप्ताह केवळ एका सरकारी उपक्रमापुरता मर्यादित न राहता, तो नागरिकांच्या गरजा आणि शासकीय सेवा यांमध्ये दुवा साधणारा ठरणार आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या सप्ताहात प्रलंबित तक्रारींचा निपटारा, अतिक्रमण निर्मूलन, घरपट्टे वाटप, सामाजिक योजनांचे थेट लाभ, तसेच विविध कागदपत्रांचे वितरण आदी उपक्रमांची रेलचेल असणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सप्ताहाच्या आयोजनासाठी बैठक पार पडली. यामध्ये जिल्हाधिकारी कुंभार यांनी सर्व यंत्रणांना स्पष्टपणे निर्देश दिले की, महसूल सप्ताह हे केवळ कामकाजाचे प्रदर्शन न राहता, ते प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील विश्वास वाढवण्याचे माध्यम ठरावे. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक भारती खंडेलवाल यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, दुय्यम निबंधक व इतर संबंधित अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

Manikrao Kokate : रमीने संपवला खेळ; ‘कृषी’ नावाचं ताज दादांनी ‘खेळा’त बदलून टाकलं

जनतेला सेवा

महसूल सप्ताहात 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जाणार आहे. निवृत्त व उत्कृष्ट सेवा देणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येईल. 2 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या पात्र नागरिकांना त्यांच्या घरांचे पट्टे देण्यात येणार आहेत. याचवेळी 3 ऑगस्ट रोजी पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत रस्ता मोजणी केली जाईल व दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करण्यात येईल. ग्रामीण भागात विकासाच्या दृष्टीने हा मोठा पाऊल ठरणार आहे.

4 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत महसूल मंडळ पातळीवर शिबिरे होणार असून, त्यामध्ये आधार कार्ड, संजय गांधी योजना ओळखपत्र, अधिवास, जात, उत्पन्न व जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेत DBT (Direct Benefit Transfer) न झालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन अडचणींचा प्रत्यक्ष आढावा घेऊन त्या दूर केल्या जातील. 6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांचे निष्कासन, शर्तभंग प्रकरणांवरील निर्णय घेण्यात येतील. यानंतर 7 ऑगस्ट रोजी कृत्रिम वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

जागेवरच निकाल

या सप्ताहाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रलंबित प्रकरणांचा जागेवरच निकाल लावण्याचा प्रशासनाचा निर्धार. जिल्हाधिकारी कुंभार यांनी स्पष्टपणे सांगितले की, पट्टेवाटप, पाणंद रस्ते मोजणी, अतिक्रमणविषयी निर्णय, ई-केवायसी पूर्तता, तसेच भूमी अभिलेख व दुय्यम निबंधक कार्यालयातील सेवा नागरिकांपर्यंत सहजतेने पोहोचवणे हे सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट असावे. नागरिकांना ‘वन-स्टॉप’ सेवा केंद्राचा अनुभव मिळेल अशी योजना आखण्यात आली आहे.

महसूल सप्ताहात लोकसहभागाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जात असून, अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, आपले प्रश्न व तक्रारी घेऊन प्रशासनाशी थेट संवाद साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुंभार यांनी केले आहे. त्यांनी म्हटले की, महसूल विभाग हा केवळ कागदपत्रांचा विभाग नाही, तो प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचा रक्षक आहे.

या संपूर्ण सप्ताहात प्रशासनाचा चेहरा जनतेच्या अधिक जवळ येईल, हे निश्चित आहे. जनतेने सजगपणे आणि सहभागातून हा सप्ताह आपलासा करावा, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. महसूल सप्ताह २०२५ हा अकोल्याच्या प्रशासकीय इतिहासात लोकाभिमुख प्रशासनाचा एक नवा अध्याय लिहील, यात शंका नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!