नागपूरमध्ये स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीने मशाल मोर्चा काढत सरकारविरोधात संताप व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेला नागपूर सध्या स्मार्ट प्रीपेड मीटरच्या वादामुळे धगधगत आहे. महावितरणकडून गुपचूपपणे सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (1 ऑगस्ट 2025) संध्याकाळी नागपूरकर रस्त्यावर उतरले. सामान्य वीज ग्राहकांच्या न्यायासाठी मशाल पेटवून त्यांनी आक्रोश व्यक्त केला. गोळीबार चौकात जमलेले आंदोलक विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली गांधीबाग उद्यानाकडे निघाले. हातात मशाली, मुखात घोषणाबाजी हे दृश्य जणू नागपूरच्या धगधगत्या मनोवृत्तीचे प्रतीक ठरत होते. या मोर्चात तरुणाईचा उत्साह विशेष जाणवत होता.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी स्पष्ट शब्दांत आपला रोष व्यक्त केला. ते म्हणाले, स्मार्ट प्रीपेड मीटर ही यंत्रणा सामान्य वीज ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारणारी आहे. यामागे उद्योगपतींचा फायदा आणि जनतेची पिळवणूक हेच एकमेव उद्दिष्ट आहे. त्यांनी महावितरणवर गुपचूपपणे हे मीटर बसविण्याचा आरोप केला आणि सांगितले की, टीओडी मीटरच्या नावाखाली नागपूर व विदर्भात लबाडी सुरू आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की, जेथे जेथे हे स्मार्ट मीटर बसविण्यात आले, तेथे वीज देयक सामान्य बिलाच्या तुलनेत 4 ते 5 पट अधिक आले.
Yavatmal : ठाकरे बंधू एकत्र, पण संजय राठोडांच्या खेळीने ‘मशाल’ मावळतीकडे
सामान्यांचा प्रचंड उद्रेक
एवढेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्येक युनिटवर 85 पैसे सवलत हे आश्वासन देखील फसवे असल्याचा आरोप त्यांनी केला. स्मार्ट मीटरप्रमाणेच वीज दरवाढी वरून नागपूरकर संतप्त आहेत. सरकारने दरवाढ 23 टक्यांनी कमी करण्याचे आश्वासन दिले असले तरी, प्रत्यक्षात दरमहा अवास्तव बिलांचा भडिमार सुरूच आहे. आंदोलकांचा ठाम आग्रह होता की, दरवाढ तातडीने रद्द झाली पाहिजे. सोबतच जुन्या बिलांची नव्याने शहानिशा झाली पाहिजे. या आंदोलनाचा केंद्रबिंदू होता, स्मार्ट मीटरचा तातडीने निष्कास, वीज ग्राहकांच्या हिताचे धोरण राबविणे आणि विदर्भासाठी स्वतंत्र राज्याची पुनः एकदा जोरदार मागणी.
गांधीबाग उद्यानाजवळ पोहोचल्यावर आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चात पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, सुनील चोखारे, नरेश निमजे, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रशांत नखाते, महिला अध्यक्षा ज्योती खांडेकर, युवा आघाडीचे गिरीश तितरमारे, व्यापारी आघाडी अध्यक्ष रवींद्र भामोडे, गणेश शर्मा, अनिल केशरवानी यांची उपस्थिती होती. हा केवळ स्मार्ट मीटरचा विरोध नव्हता, तर तो नागपूरसह विदर्भाच्या असंतोषाचा आवाज होता. वीज ग्राहकांच्या हक्कासाठी पेटलेली ही मशाल केवळ उर्जेचा नव्हे तर स्वातंत्र्याचा प्रकाश घेऊन आली होती.
Congress : खोटारडेपणाचे ऑलिंपिक झाले, तर फडणवीसांना सुवर्णपदक मिळेल
