सायबर आकाशात आता ‘गरुड दृष्टी’ची उंच भरारी, अफवा, द्वेष आणि गुन्ह्यांच्या पंखांना नागपूर पोलिसांची धारदार कात्री, डिजिटल सावल्यांनाही आता नाही सुटण्याची सुतराम शक्यता.
सायबर गुन्ह्यांचा वेग वाढतोय, पद्धती बदलतायत, पण नागपूर पोलिसांनी त्याला एक जबरदस्त ‘डिजिटल ब्रेक’ लावण्याची तयारी केली आहे. जसे आकाशात गरुड हजारो फुटांवरूनही शिकार टिपतो, तसेच ‘गरुड दृष्टी’ हे नवे तंत्रज्ञान गुन्ह्यांची सावलीसुद्धा नजरेआड होऊ देत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नागपूरमध्ये या अत्याधुनिक सोशल मीडिया मॉनिटरिंग प्रकल्पाचे दमदार सादरीकरण झाले, आणि यानंतर सायबर गुन्हेगारांच्या काळजाचे ठोके चुकणे स्वाभाविकच आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाबद्दल सांगताना स्पष्ट केले की, सोशल मीडिया हा अभिव्यक्तीचा महत्त्वाचा मंच आहे. पण त्याच मंचाचा वापर अफवा, द्वेष, जातीय तणाव, अमली पदार्थांची देवाणघेवाण आणि गुन्हेगारीसाठी होतो, ही वास्तवता लक्षात घेऊनच ‘गरुड दृष्टी’ची निर्मिती झाली. नागपूर पोलिसांनी घरच्या घरी, अल्प खर्चात आणि स्वतःच्या हक्कांसह तयार केलेले हे टूल, एका क्षणात संशयास्पद पोस्ट्सचा मागोवा घेऊन त्यावर थेट कारवाई करू शकते.
डिजिटल अस्त्र
सायबर हॅक 2025 स्पर्धेतून जन्मलेली ही स्थानिक नवकल्पना आज देशभरात आदर्श ठरण्याच्या मार्गावर आहे. ‘गरुड दृष्टी’ सुरू झाल्यापासून केवळ काही महिन्यांत 30 हजार हून अधिक पोस्ट्सची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 650 आक्षेपार्ह पोस्ट्स हटवण्यात पोलिसांना यश आले आहे. समाजमाध्यमांमधून निर्माण होणारे वाद, अफवा आणि तणावजनक मजकूर यांचा फैलाव रोखण्यासाठी हे साधन पोलिसांच्या शस्त्रागारातील ‘डिजिटल अस्त्र’ ठरत आहे.
कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाचा उपक्रम जाहीर केला. सायबर फसवणुकीतून वाचवलेली लाखो रुपयांची रक्कम थेट पीडितांच्या हाती सुपूर्द करण्यात आली. नागरिकांनी संशयास्पद कॉल, मेसेज किंवा ऑनलाईन ऑफरवर विश्वास न ठेवता 1930 किंवा 1945 या हेल्पलाईनवर त्वरित कळवावे, असे आवाहन त्यांनी केले. वेळेत दिलेल्या तक्रारींमुळे आणि पोलिसांच्या चपळ कारवाईमुळेच अनेक कुटुंबांचा आर्थिक बचाव झाला, असे त्यांनी नमूद केले.
Devendra Fadnavis : पवारांचा खुलासा म्हणजे सलीम-जावेदची स्क्रिप्ट
ठाम विश्वास
मुख्यमंत्र्यांनी यावेळी पोलिस दलाच्या सतर्कतेचे कौतुक करताना, पीडित नागरिकांनाही ‘सायबर जनजागृतीचे राजदूत’ म्हणून कार्य करण्याचे आवाहन केले. गुन्हेगार कितीही कुशल असला, तरी प्रत्येक गुन्ह्यामागे एक डिजिटल ठसा राहतो, आणि तो शोधून काढण्याची ताकद महाराष्ट्र पोलिसांकडे आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘गरुड दृष्टी’च्या वैशिष्ट्यांमध्ये सोशल मीडिया मॉनिटरिंगची टोकाची क्षमता, तातडीची कारवाई, स्थानिक बुद्धिमत्ता आणि स्वावलंबन, तसेच ट्रेंड्सचे विश्लेषण, संशयास्पद खाते शोधणे आणि तत्काळ कृती करण्याची क्षमता यांचा समावेश आहे. या साधनामुळे नागपूर पोलिसांनी सोशल मीडियाच्या अवकाशात स्वतःचा एक अदृश्य परंतु अत्यंत प्रभावी ‘डिजिटल गरुड’ सोडला आहे. त्याच्या नजरेतून गुन्हेगार सुटणे आता जवळपास अशक्यच.
