नागपूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी, वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यांवरील शिस्तभंग यामुळे नागपूरची वाहतूक व्यवस्था मोठ्या ताणातून जात आहे. अशात वाहतूक पोलिस विभागाचे उपायुक्त लोहित मतानी कोणतीही कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळं आता सीपी स्वत: अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
उलट वाहतूक व्यवस्थेतील गुंतागुंत त्यांच्या कार्यकाळात वाढली. अपघात रेकॉर्डवर नसले तरी दररोज लोकांना दुखापत होत आहे. त्यामुळं आता पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी स्वत: शहरातील वाहतूक व्यवस्थेला शीस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारपेठ, हॉस्पिटल क्षेत्र, व्यस्त चौक आणि मुख्य मार्गांवर वारंवार निर्माण होणाऱ्या कोंडीनं नागरिकांचा त्रास वाढला आहे. आता लोकांसाह लोकप्रतिनिधी देखील यावर संताप व्यक्त करीत आहेत. लवकरच राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. अशात नागपुरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा गाजू शकतो, असे चित्र होते. उपायुक्त लोहित मतानी नागपुरातील वाहतुकीला शीस्त लावू शकले नाही. एखाद्या पीआरओ प्रमाणे ते काम करीत आहेत. स्वत:चेच फोटो आणि स्वत:चेच कौतुक करून घेण्यात ते धन्यता मानत आहेत.
वाहतूक विभागाच्या उपायुक्त पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर लोहित मतानी यांना पुरेसा वेळ आयुक्तांनी दिला. वाहतूक शाखा आणि स्वत: लोहित मतानी काय बदल घडवितात, याचं निरीक्षण पोलिस आयुक्तांनी केलं. वाहतूक शाखेला मदत करण्याचे आदेश सर्व पोलिसांना दिले. परंतु मतानी कोणताही बदल दाखवू शकले नाही. त्यांच्या पेक्षा त्यांचे ज्युनिअर अधिकारी व पूर्वीचे उपायुक्त अर्चित चांडक चांगले होते, अशी प्रतिक्रिया लोक आणि लोकप्रतिनिधी व्यक्त करू लागले. त्यामुळं अखेर पुरेसा वेळ दिल्यानंतर आयुक्त डॉ. सिंगल यांनाच आता वाहतुकीच्या मुद्द्यावर स्वत:हून लक्ष घालण्याची वेळ आली आहे.
Nagpur Traffic : अपघात कमी झाले हो… अब्रु वाचविण्यासाठी DCP झाले PRO
सगळं ध्यानात आलं
नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. वाहतूक शाखेच्या कामकाजाचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले. त्यातून आता वाहतूक समस्येवर जलद उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात येणार आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्मार्ट ट्रॅफिक पोलिस’ उपक्रमाला गती देण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी वाहतूक नियंत्रण अधिक परिणामकारक करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांजवळ ब्लिंकर कॉलर, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट आणि सुधारित ट्रॅफिक बॅटन असेल.
शहरातील एअरपोर्ट परिसर, बर्डी, RBI चौक, छत्रपती चौक आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी विशेष पथके तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अवैध पार्किंगवर कठोर मोहिम राबवली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गावातील वाहतूक व्यवस्था पुरती खड्ड्यात गेली होती. विना नंबर प्लेट वाहने फिरताना दिसत होती. काही वाहनांवर हुटर आणि पोलिसांप्रमाणे लाइटही दिसत होते. मात्र वाहतूक पोलिसांचं याकडं दुर्लक्ष होतं. त्यामुळे नाईलाजाने स्वत: पोलिस आयुक्तांनाच याप्रकरणी लक्ष देणे भाग पडले.
अधिकाऱ्यांचं अपयश
खरं तर पोलिस आयुक्तांचं पद हे अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाचं आहे. प्रत्येक गोष्टीत त्यांना लक्ष घालण्याचं काम पडू नये अशी व्यवस्था असते. सहपोलिस आयुक्त असतात. अतिरिक्त पोलिस आयुक्त असतात. उपायुक्त असतात. डॉ. सिंगल यांच्या टीमधील हे सर्व अधिकारी अत्यंत मेहनतीने रात्रंदिवस काम करत होते. मात्र वारंवार लक्षात आणून दिल्यानंतरही पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांचा वाहतूक विभाग सुस्त पडला होता. त्यामुळं पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनाच दखल घ्यावी लागली असं आता सांगण्यात येत आहे. वाहतूक विभागासाठी ही बाब लाजीरवाणी आहे.
