महाराष्ट्र

Vikas Thakre : नागपुरात गुन्हेगारीचे थैमान

Assembly Session : पाच महिन्यांत ३७ खून

Post View : 32669

Author

नागपूरमध्ये वाढत्या खून, वाहनचोरी, महिलांविरुद्धचे गुन्हे, ड्रग्ज तस्करी आणि भूमाफियांच्या कारवायांवरून आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरत कठोर उपाययोजनांची मागणी केली.

Congress On Law & Order : राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा अत्यंत गंभीर मुद्दा विधानसभेत उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरले. शहरातील कायदा व सुव्यवस्थेची खालावत चाललेली परिस्थिती, महिलांविरुद्ध वाढणारे गुन्हे, बालगुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, वाहनचोरी तसेच भूमाफियांच्या वाढत्या कारवायांबाबत त्यांनी सरकारकडे सविस्तर उत्तराची मागणी केली.

आमदार ठाकरे यांनी राष्ट्रीय गुन्हे अभिलेख ब्युरो (NCRB) च्या २०२४ च्या अहवालाचा संदर्भ देत नागपूर शहरातील गुन्हेगारीची चिंताजनक आकडेवारी सभागृहासमोर मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२४ मध्ये नागपुरात ८८ खून नोंदविण्यात आले असून खुनांच्या प्रमाणात देशातील १९ प्रमुख महानगरांमध्ये नागपूरचा दुसरा क्रमांक लागतो. ही बाब शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.

Crime Branch: नागपूर हिंसाचाराच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न

बालगुन्हेगारी वाढली

बालगुन्हेगारीमध्येही सातत्याने वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. सन २०२२ मध्ये २१० गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर २०२४ मध्ये ही संख्या वाढून २८३ वर पोहोचली आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ झाली असून २०२२ मध्ये १,२५९ गुन्हे नोंदविले गेले होते, तर २०२४ मध्ये हा आकडा १,५१३ वर गेला आहे.

NCRB च्या आकडेवारीनुसार महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये नागपूरचा देशातील महानगरांमध्ये सातवा क्रमांक आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये पाचवा, लैंगिक छळाच्या गुन्ह्यांमध्ये तिसरा तर मानवी तस्करीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये चौथा क्रमांक लागल्याचेही ठाकरे यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले.

याशिवाय २०२६ च्या केवळ पहिल्या पाच महिन्यांत नागपूर शहरात ३७ खून आणि तब्बल ७५२ वाहनचोरीच्या घटना नोंदविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अमली पदार्थांची वाढती तस्करी आणि त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी ही चिंतेची बाब असून यामुळे युवकांचे भविष्य धोक्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Vikas Thakre : रस्त्याच्या ढिसाळपणावर आमदाराने ठेवले बोट

भूमाफिया सक्रिय

भूमाफियांच्या वाढत्या कारवाया, शासकीय व खासगी जमिनींवरील अतिक्रमणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावण्याचे प्रकार आणि त्यासंदर्भातील वाढत्या तक्रारींमुळे नागपूरकरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने कोणत्या विशेष उपाययोजना केल्या आहेत आणि अपेक्षित कारवाईमध्ये विलंब का होत आहे, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी केली. नागपूरकरांच्या सुरक्षिततेसाठी केवळ घोषणांपेक्षा कठोर आणि परिणामकारक कारवाईची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

आरती जोशी | Aarti Joshi

आरती जोशी | Aarti Joshi

आरती जोशी या द लोकहित लाइव्ह येथे रिपोर्टर आणि टेक्निकल विभागाच्या सहाय्यक प्रमुख देखील आहेत. कॉम्प्युटर विषयात त्यांनी वेबसाइट डेव्हलपमेंट, मोबाइल अॅप डेव्हलपमेंट आणि कोडिंग याचेही उच्च शिक्षण प्राप्त केले आहे.

More Posts - Website

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!