महाराष्ट्र

Congress : आश्वासनं पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा 

Harshwardhan Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा झणझणीत इशारा 

Post View : 39

Author

काँग्रेसने महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या आणि लाडकी बहीण योजनेवरून घेरलं आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका करत, दिल्लीत जा आणि निधी आणा, असे म्हटले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सडेतोड आणि संतप्त शैलीत जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बहिणींना दोन हजार 100 रुपये द्यायला जर सरकार अपयशी ठरत असेल, तर त्यांनी आपल्या खुर्च्या खाली कराव्यात, असा थेट आणि झणझणीत इशारा त्यांनी दिला.

कर्जाच्या ओझ्याखाली पिचलेल्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटांची मालिका कोसळतेय. शेतमालाला हमीभाव नाही, सरकार मात्र समित्या नेमून वेळकाढूपणा करत आहे. शासनाच्या गुढ्या उभारणाऱ्यांना बहिणींच्या दोन हजार 100 रुपयांची आठवण नाही, पण अदानी-अंबानीसाठी मात्र हजारो कोटींची पायघड्या. अशा शब्दांत सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांच्या संवेदनशून्यतेचा समाचार घेतला.

Bacchu Kadu : उपोषण स्थगित, पण थेट मंत्रालयात घुसण्याचा इशारा 

सातबारा कोरा करा

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी जबाबदारीने प्रश्न विचारताच त्यांना धमकावल्याचा आरोप करत, तुम्ही जनतेचे सेवक आहात मालक नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. कर्जमाफी जाहीर करताना समितीची आठवण का झाली नाही? निवडणुकीत आश्वासने देताना तिजोरी कुठे होती?bअसा थेट सवाल करत त्यांनी सरकारच्या निष्ठा व प्राथमिकतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं.

हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केला की, अदानी-अंबानी यांना लाभ देण्यासाठी सरकारकडे भरपूर निधी आहे, पण राज्याच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि भगिनींना दोन हजार 100 रुपये द्यायला मात्र निधी नाही, हे दुर्दैव आहे. समृद्धी महामार्ग असो, सुरजागडची खदानी असो, की घोडबंदर बोगदा, सर्व प्रकल्पांत फडणवीस-शिंदे-पवारांची ‘कमिशनशाही’ सुरू आहे, आणि जनतेच्या ताटात शून्य, अशी कठोर टीका त्यांनी केली.

Bacchu Kadu : तातडीने उपचार हवा, अन्यथा जीवाला धोका 

दिल्लीत जा, निधी आणा

जर राज्याची तिजोरी रिकामी असेल, तर दिल्लीत जाऊन मोदी-शहा यांच्याकडून राज्यासाठी भरीव निधी आणा, अशी खणखणीत मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर समित्यांचा खेळ थांबवा, आणि तातडीने शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करा, भगिनींना सन्मानाने दोन हजार 100 रुपये द्या, असा ठाम इशारा देत, संयमाचा अंत पाहू नका. अन्यथा जनतेचा राग सत्ताधाऱ्यांना महागात पडेल, असेही स्पष्ट केले.

शेतकरी, बेरोजगार, महिला, युवक या सगळ्यांचं सरकारकडून शोषण सुरू आहे. काँग्रेसने आता हे प्रश्न सभागृहाच्या भिंतीपलिकडे नेण्याचा निर्धार केला आहे. जनतेचा संयम आता संपत चालला आहे. जर तातडीने निर्णय घेतला नाही, तर शेतकरी आणि भगिनींच्या रस्त्यावरील संघर्षाला थांबवता येणार नाही, असा स्पष्ट इशारा सपकाळ यांनी दिला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!