भंडारा-गोंदिया जिल्ह्यात महायुतीने सर्व निवडणुकींमध्ये विजय मिळवला. ज्यात भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वात सहकार क्षेत्रात ठाम वर्चस्व प्रस्थापित झाले.
पूर्व विदर्भाच्या राजकीय रणभूमीवर महायुतीने आपला दबदबा कायम ठेवला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये महायुती, विशेषतः भारतीय जनता पक्ष, यांनी सहकार क्षेत्राच्या निवडणुकींमध्ये विजयाचा झेंडा फडकावला आहे. या यशामागील खरे शिल्पकार आहे ते म्हणजे, भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. त्यांच्या कुशल नेतृत्वाने आणि राजकीय बुद्धिबळाच्या खेळातील चाणाक्षपणाने महायुतीने प्रत्येक निवडणुकीत आपला गड राखला आहे. मग ती भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक असो, दुग्ध संघाची निवडणूक असो, की विधानसभेची लढाई. डॉ. परिणय फुके यांच्या रणनीतीने प्रत्येकवेळी बाजी मारली आहे.
नुकतीच पार पडलेली भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्षपदाची निवडणूक हा त्यांच्या यशाचा आणखी एक दाखला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील फुंडे यांची तिसऱ्यांदा अध्यक्षपदी, तर भाजपचे प्रदीप पडोळे यांची पहिल्यांदाच उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या विजयाच्या मागे डॉ. फुके यांचा राजकीय डावपेचांचा मास्टरस्ट्रोक होता. त्यांनी काळ्या-पांढऱ्या बुद्धिबळाच्या पाटावर आपले मोहरे इतक्या चातुर्याने चालवले की, महायुतीने पुन्हा एकदा बँकेच्या सत्तेवर कब्जा केला. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या चार संचालकांनी निवडणुकीत अर्ज न भरल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. यामागेही डॉ. परिणय फुके यांचे गुप्त समन्वय कौशल्य असल्याचे बोलले जाते.
Prashant Padole : पूरग्रस्त नागरिकांचे तारणहार बनले काँग्रेस खासदार
राजकारणात विश्वासाची जडणघडण
डॉ. परिणय फुके हे केवळ राजकारणी नाहीत, तर एक कुशल रणनीतीकार आणि सहकार क्षेत्राचे खंदे समर्थक आहेत. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या डॉ. फुके यांनी राजकीय बुद्धिबळातही आपली चाल अचूक खेळली आहे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 21 संचालक उपस्थित होते. 17 विरुद्ध 4 असा निकाल लागल्यानंतर फुंडे यांचे अध्यक्षपद निश्चित झाले होते. तरीही, डॉ. फुके यांनी या निवडणुकीला औपचारिकता देऊन विजयाचा सोहळा साजरा केला. 13 ऑगस्ट रोजी बँकेच्या सभागृहात सुनील फुंडे आणि प्रदीप पडोळे यांचा सत्कार सोहळा पार पडला, जिथे गोंदिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन, राष्ट्रवादीचे धनंजय दलाल, शिंदे सेनेचे अनिल गायधने, माजी मंत्री नाना पंचबुध्दे आणि भाजपचे बाळा अंजनकर यांसारखे दिग्गज उपस्थित होते.
सुनील फुंडे यांनी आपल्या निवडीनंतर बँकेच्या प्रगतीबद्दल आभार व्यक्त करताना सांगितले, ही शेतकऱ्यांची बँक आहे. आम्ही प्रतिकूल परिस्थितीतून बँकेला उभारी दिली. यापुढेही बँकेची प्रगती आणि शेतकऱ्यांचा विश्वास जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महाराष्ट्रात ही बँक अग्रेसर राहील, याची मी ग्वाही देतो. या विजयाने भंडारा-गोंदियाच्या सहकार क्षेत्रात महायुतीचा प्रभाव आणखी दृढ झाला आहे. डॉ. फुके यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने केवळ सत्ता मिळवली नाही, तर लोकांचा विश्वासही संपादन केला आहे. त्यांच्या रणनीती आणि समर्पणामुळे पूर्व विदर्भात भाजप आणि महायुतीचा झेंडा उंच फडकत आहे. या विजयाने डॉ. फुके यांनी सिद्ध केले की, राजकारण हा केवळ सत्तेचा खेळ नाही, तर जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी केलेली तळमळ आहे.
