नागपूरच्या वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेचा विजय. ऑपरेशन यूटर्नच्या माध्यमातून एका निरागस मुलीचा जीव वाचला.
नागपूर शहरात आता एक नवा अध्याय लिहिला जात आहे. शिस्तीचा, कायद्याचा आणि सुरक्षेचा. रस्त्यांवरील गोंधळापासून ते गुन्हेगारी टोळ्यांच्या दहशतीपर्यंत, प्रत्येक पावलावर नागपूर पोलिसांचा शिस्त हवीच हा संदेश घुमतोय. नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या ऑपरेशन थंडर आणि ऑपरेशन यू-टर्न या मोहिमांनी शहराला एक नवं रूप दिलं आहे. रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या चालकांपासून ते गुन्हेगारी विश्वात दहशत माजवणाऱ्या टोळ्यांपर्यंत, सगळ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. मागील महिन्यात सुरू झालेल्या ऑपरेशन यू-टर्नने शहरातील वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना चांगलाच चाप बसवलाय.
आयपीएस लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या कल्पकतेने ही मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. दारू पिऊन वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने गाडी हाकणे, हेल्मेट न घालणं यासारख्या सवयींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. रस्त्यांवर शिस्त आणण्यासाठी आणि गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलिसांचा हा महायज्ञ अविरत सुरू आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीतूनच नुकतीच एक मोठी कारवाई घडली.नुकतंच, गोंडखरी टी-पॉइंट येथे ऑपरेशन यू-टर्न अंतर्गत एका संशयास्पद मोटरसायकलवर पोलिसांची नजर खिळली.
Ravikant Tupkar : पीक विम्याच्या थट्टेवर मंत्रालयात हल्लाबोल
शिस्तीसोबत सामाजिक सुरक्षा
एमआयडीसी झोनचे अधिकारी कर्तव्य बजावत असताना त्यांना या मोटरसायकलवर बसलेला चालक आणि त्याच्यासोबत असलेली मुलगी यांचा व्यवहार संशयास्पद वाटला. प्राथमिक चौकशीत चालकाकडून उडवाउडवीची उत्तरं मिळाली. यानंतर सखोल तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. मोटरसायकलवर असलेली मुलगी, आचल अरुण सहारे (वय 16 वर्षे, 9 महिने, राहणार जैतपूर, तालुका बिचवा, छिंदवाडा) ही अल्पवयीन होती. तिच्यासोबत असलेला मुलगा, सुभाष सुधाकर शिलू (वय 19, राहणार चौरे पठार, छिंदवाडा) याने तिला तिच्या कुटुंबाला काहीही न सांगता घेऊन आल्याचं उघड झालं.
पोलिसांनी तात्काळ लोधीखेडा पोलीस स्टेशन, मध्य प्रदेश यांच्याशी संपर्क साधला. तिथे या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल असल्याचं समजलं. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मुलीला सुखरूप मुक्त केलं आणि तिच्या सुरक्षिततेसाठी पुढील पावलं उचलली. ही संपूर्ण कारवाई डीसीपी लोहित मतानी आणि पीआय मिराशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात एपीआय धुमाळ, पोलीस हवालदार विजय मिश्रा, रामेश्वर, अंकुश आणि संजय यांनी मोलाची भूमिका बजावली.नागपूर पोलिसांचा हा शिस्तीचा नवा मंत्र शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. ऑपरेशन यू-टर्नने केवळ वाहतूक नियमांचं पालन करवून घेण्यापुरतं मर्यादित न राहता, सामाजिक सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे.
Nitin Gadkari : ज्ञानयोगी जिचकार उड्डाणपुलाने नागपूरच्या विकासाला पंख
अल्पवयीन मुलीच्या सुटकेसारख्या घटनांनी पोलिसांच्या सतर्कतेची आणि कर्तव्यदक्षतेची चुणूक दाखवली आहे. रस्त्यांवरील बेदरकारपणा असो वा गुन्हेगारी विश्वातील दहशत, नागपूर पोलिसांनी प्रत्येक आव्हानाला तोंड देण्याची तयारी केली आहे.या मोहिमेमुळे नागपूरकरांना एका सुरक्षित आणि शिस्तबद्ध शहराची हमी मिळाली आहे. डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली आणि आयपीएस लोहित मतानी यांच्या धडाडीने, नागपूर पोलिसांनी शहराला एक नवा चेहरा दिला आहे.
